शेतकऱ्यांनी तलाठ्याला मारुतीच्या मंदिरात डांबले
By Admin | Updated: July 2, 2014 23:28 IST2014-07-02T23:28:00+5:302014-07-02T23:28:00+5:30
तलाठ्याने केलेल्या बोगस सर्वेक्षणाने गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क तलाठ्याला मारुतीच्या मंदिरात दोन तास डांबून ठेवले. ही घटना महागाव

शेतकऱ्यांनी तलाठ्याला मारुतीच्या मंदिरात डांबले
महागाव : तलाठ्याने केलेल्या बोगस सर्वेक्षणाने गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क तलाठ्याला मारुतीच्या मंदिरात दोन तास डांबून ठेवले. ही घटना महागाव तालुक्यातील वडद येथे बुधवारी दुपारी घडली.
महागाव तालुक्यात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली. रबी हंगाम उद्ध्वस्त झाला. शासनाने मदतीची घोषणा केली. त्यानंतर तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण केले. अहवाल शासनाला सादर केला. परंतु महागाव तालुक्यातील वडद येथील गारपीटग्रस्तांची नावे मदतीच्या यादीतच नाही. तलाठ्याने बोगस सर्वेक्षण केल्याने मदतीपासून वंचित असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. दरम्यान आज वडदचे तलाठी एस.व्ही. रायपूरकर गावात आले. त्यांना पाहताच गावकऱ्यांनी घेराव टाकला. सर्वेक्षणाबाबत जाब विचारला. एवढ्यावरच समाधान झाले नाही तर गावातील मारुती मंदिरात नेऊन त्यांना डांबले. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वडद गाठले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांनाही माहिती दिली. पोलिसही त्याठिकाणी दाखल झाले. दीडशे ते २०० शेतकरी त्याठिकाणी उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढत योग्य सर्व्हेक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी तलाठ्याला सोडले. तब्बल दोन तास तलाठी मंदिरात कोंडून होता.
(तालुका प्रतिनिधी)