कर्जमाफीसाठी शेतकरी धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:02 IST2019-06-07T21:02:17+5:302019-06-07T21:02:49+5:30
पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही.

कर्जमाफीसाठी शेतकरी धडकले
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकली नाही. अखेर या शेतकऱ्यांना परत फिरावे लागले.
बाभूळगाव तालुक्यातील कोटंबा, कृष्णापूरच्या शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर झाले. मात्र वर्ष लोटले तरी अनेक शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे मिळाले नाही. आता तरी कर्ज द्या, असे म्हणत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या दिला. मात्र जिल्हाधिकारी हजर नसल्याने त्यांना दोन तास वाट पाहावी लागली.
शंकर मेंढे यांचे २०१५ मध्ये घेतलेले कर्ज माफीला पात्र ठरले. याची रक्कमही जिल्हा बँकेकडे आली. पण परतावा जास्त अन् रक्कम कमी आहे, हे कारण सांगत कर्जाचे पैसे परत गेले. शंकर मेंढे यांचे ३५ हजारांचे कर्ज होते. तर राजू मेंढेचे ७४ हजार रूपयांचे कर्ज होते. या दोन्ही प्रकरणात मंजूर झालेली रक्कम कमी पडत आहे, असे सांगत पैसे परत गेले. सदानंद झांबरे यांनी २००८-०९ मध्ये ३२ हजारांचे कर्ज घेतले होते. त्यांचे नाव अद्यापही ‘ग्रीन लिस्ट’मध्ये आले नाही. दिवाकर भानस यांनी २००७-०८ मध्ये १५,७०० रूपयांचे तर वामन गुरनुले यांनी ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. दिलीप डाखोरेकडे ५० हजार रूपयांचे कर्ज आहे. नलू गुरनुले, कमला रामगडे, चंद्रकला येंडे, सरस्वता गवत्रे हे जिल्हा बँक, ग्रामीण बँक आणि सेन्ट्रल बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत. बँक अधिकारी शेतकऱ्यांना सन्मान देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तांत्रिक चुकांनी वाढली ‘यलो लिस्ट’
बँक खाते क्रमांक चुकणे, आयएफएससी कोड नसणे, आधार नंबर चुकणे, बँक आणि शेतकºयांच्या रकमेत तफावत असणे अशा तांत्रिक कारणांमुळेही पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले आहेत. त्यांचा जिल्ह्यातील आकडा २० हजारांच्या जवळपास आहे. हे सर्व शेतकरी ‘यलो लिस्ट’मध्ये आहेत.
‘यलो लिस्ट’मधील शेतकऱ्यांची माहिती बँकेने हब सेंटरला दुरुस्त करून पाठविली आहे. मात्र सुधारित यादी अजूनही आली नाही. या यादीत १५ ते २० हजार शेतकरी आहेत.
- अरविंद देशपांडे
सीईओ, जिल्हा बँक, यवतमाळ