नवीन पीक विम्याबाबत शेतकरी सापडले संभ्रमात
By Admin | Updated: June 25, 2014 00:41 IST2014-06-25T00:41:57+5:302014-06-25T00:41:57+5:30
राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात राबविण्यात येत असलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नवीन पीक विम्याबाबत शेतकरी सापडले संभ्रमात
मारेगाव : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात राबविण्यात येत असलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. मात्र मागील २०१३ च्या हंगामातील खरीप पीक विम्याचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
मागीलवर्षी २०१३ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले़ परिणामी तालुक्याची पीक आणेवारी ५० टक्केच्या आत आली़ शासनाने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली़ मात्र मागील हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या खरीप पीक विम्याबाबत शासन स्तरावरून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने पीक विम्याबाबत शेतकऱ्यात प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
यावर्षी आता आता नव्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अपुरा पाऊस, पावसातील खंड, अतिपाऊस या तीन हवामान घटकाच्या पीक विमा योजना खरीप हंगाम २०१४ साठी प्रथमच लागू करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या चार पिकांसाठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात महसूल मंडळनिहाय ही पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे़
या नावीन्यपूर्ण पीक विमा योजनेत कापूस पिकासाठी २२ हजार रूपये प्रतिहेक्टरी विमा संरक्षण आहे. त्यासाठी दोन हजार ३५४ रूपये प्रति हेक्टरी विमा हप्ता ठरविण्यात आला़ यापैकी केवळ १ हजार २७९ रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. सोयाबिनसाठी प्रतिहेक्टरी १९ हजार रूपयाचे विमा संरक्षण असून एक हजार ४२५ रूपये विमा हप्ता आहे़ शेतकऱ्यांना त्यातील ८२५ रूपये विमा हप्ता भरावा लागेल़ मूग पिकासाठी १५ हजार प्रतिहेक्टरी विमा संरक्षण असून विमा हप्ता ९०० रूपये असला तरी शेतकऱ्यांना ५६४ रूपये, तर उडीद पिकासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रूपये विमा संरक्षण असून विमा शेतकऱ्यांना केवळ ७२० रूपये भरावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)