निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे
By Admin | Updated: June 30, 2014 00:08 IST2014-06-30T00:08:20+5:302014-06-30T00:08:20+5:30
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जून महिना संपला तरी पाऊस आला नाही.

निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे
पुसद : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जून महिना संपला तरी पाऊस आला नाही. परिणामी तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न अधुरेच आहे.
गतवर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. शेतीची मशागत आटोपली आणि सुरू झाली पावसाची प्रतीक्षा. मात्र रोहिणी मृगनक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खातेही हतबल दिसू लागले. पाऊस नेमका कधी पडेल हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक कर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु अद्यापही तालुक्यात २० टक्केच्यावर पेरणी झाली नाही. शेतशिवार आजही काळेशार दिसत आहे.
ग्रामीण भागात गुरांच्या पाण्याचा आणि वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावागावातील नदी-नाले आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. अद्यापही पाऊस बरसला नसल्याने ओला चारा कुठेही उपलब्ध नाही. आताही पाऊस झाल्यास हिरवा चारा निघण्यास १५ ते २० दिवस लागतील. अशा स्थितीत जनावरांना जगवायचे कसे असा प्रश्न पडला आहे. गुरांना उसाचे पाचाड खाऊ घालून कशीबशी तजबीज सुरू आहे. एकंदरित निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांसोबतच जनावरांनाही फटका बसत आहे. (तालुका प्रतिनिधी)