शेतीच्या ताब्यासाठी शेतकऱ्याचा उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न
By सुरेंद्र राऊत | Updated: September 14, 2022 18:01 IST2022-09-14T17:59:42+5:302022-09-14T18:01:14+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सातर्कतेने अनर्थ टळला.

शेतीच्या ताब्यासाठी शेतकऱ्याचा उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न
यवतमाळ : स्वतःच्या शेतीचा ताबा मिळविण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजविणारा शेतकरी सबलसिंग निर्मल भोसले, रा. कापरा पारधी 'बेडा, तालुका यवतमाळ यांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कॅबिनमध्येच विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यालयात चांगलीच तारांबळ उडाली.
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सातर्कतेने अनर्थ टळला. लगेच विषाची बॉटल हिसकावून शेतकऱ्याची समजूत काढण्यात आली. कापरा पारधी 'बेडा, तालुका यवतमाळ येथे गट नं. १५७ मध्ये शेतकरी भोसले यांच्या शेतजमीनवर ईतर ४० कुटुंबानी अतिक्रमण केले आहे. ते काढण्यासाठी, यवतमाळ तहसीलदार, उपविभागीय भुमिअभिलेख अधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदन देवूनही न्याय मिळाला नसल्याने आज जिल्हाधिकारी यांचे नावे निवेदन देतांना, कंटाळून आई वडिल व पत्नी व आठ मुलांना घेवून सबलसिंग भोसले याने आत्महत्येचा प्रयत्न केला.