शेत मालक बदलला; एमडी ड्रग्ज प्रकरणामागे भूखंड माफियांचा मनसुबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:27 IST2025-01-29T17:25:38+5:302025-01-29T17:27:25+5:30
Yavatmal : पोलिस मुख्यालयातून पळाला सूत्रधार; शेतीमुळे मालकावर लावला घात

Farm owner changed; Plot mafia's plan behind MD drugs case
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एमडी ड्रग्ज व देशी कट्टा कारवाईला वेगळीच किनार असल्याचे पुढे आले आहे. वाकी येथील ६४ लाख रुपये किमतीच्या शेतजमिनीच्या मालकाचे नाव वापरत दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून परस्पर खरेदी केली. हा व्यवहार मूळ मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने भूखंड माफियांना धारेवर धरले. आपण अडचणीत येणार याची कुणकुण लागल्याने भूखंड माफियांनी कट रचून एमडी ड्रग्ज व देशी कट्टा प्रकरणात त्या शेतमालकालाच अडकविले आहे.
पुन्हा भूखंड माफिया यवतमाळात सक्रीय झाले. बनावट कागदपत्र तयार करून २०१६ मध्ये अनेकांचे भूखंड लाटणारी टोळी कारागृहात गेली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा त्यांनी परस्पर शेत खरेदी करून घेतले. इतकेच नव्हे तर सातबारा व फेरफार हा सुद्धा ऑनलाइन करून घेतला. या सराईत टोळीतील केवळ दोन सदस्य पोलिस रेकॉर्डवर आले आहेत. राजकीय आश्रय असलेल्या बंधुंना धक्का लागू नये यासाठी पोलिस दलातही फेरबदलाच्या हालचाली झाल्या आहेत.
यावरून एमडी ड्रग्ज व देशी कट्टा प्रकरणात खरे सूत्रधार कधी रेकॉर्डवर येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. एलसीबी पथकाने सोमवारी पहाटे धाड टाकून अनुप जयस्वाल व राकेश यादव यांना अटक केली. त्यावेळी या कटातील एक सूत्रधार पोलिस मुख्यालयात उपस्थित होता. पोलिसासमक्षच तो तेथून पसार झाला.
फोटो बदलवून आधार, पॅन कार्डचा केला वापर
यवतमाळ शहरात भूखंड माफियांची टोळी सक्रिय झाली. त्यांनी बनावट दस्तावेज तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यासाठी मूळ मालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड बनावट तयार केले जाते. त्यावर नाव कायम ठेवत केवळ फोटो बदलविला जातो. मालमत्तेच्या खरेदीची नोंद, फेरफार घेताना फोटो पाहिला जातो, आधार व पॅन खरे आहे का याची पडताळणी होत नाही. हीच बाब भूखंड माफियांनी हेरली आहे. त्याच पद्धतीने त्यांनी वाकी येथील शेतीचा मालकाचा फोटो बदलवून व्यवहार केला असल्याचा संशय आहे.
एक गुन्हा लपविण्यासाठी रचला दुसऱ्या गुन्ह्याचा कट
पोलिसाच्या खबऱ्याला हेरुन भूखंड माफियाने पद्धतशीरपणे एमडी ड्रग्जची टीप त्यांच्यापर्यंत पोहोचविली. अडचणीचा ठरणाऱ्या व्यक्तीला अडकविण्याचा पुरेपूर बेत आखला. एलसीबीतील अनुभवी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळीच संशय आला. मात्र तोपर्यंत यातील एक सूत्रधार त्यांच्या समोरच पसार झाला. आता या प्रकरणात अनेक कंगोरे तयार झाले आहे. हा दबाव झुगारून पोलिस वास्तव बाहेर काढतील का याची प्रतीक्षा आहे.
'लोकमत'ने उघड केला होता भूखंड घोटाळा
- २०१६ मध्ये भूखंड माफियांच्या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांच्या प्लॉटवर, शेतीवर कर्जाची परस्पर उचल केली. काही प्रकरणात खरेदी-विक्रीचे व्यवहार केले होते.
- 'लोकमत'ने वृत्ताच्या माध्यमातून हा घोटाळा उघड केल्यानंतर मालमत्ताधारकांनी पोलिसांत तक्रारी दिल्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन झाली.
- त्याचे प्रमुख आताचे अपर पोलिस अधीक्षक व तत्कालीन यवतमाळ एसडीपीओ पीयूष जगताप होते. त्यावेळीसुद्धा शिवा, राकेश यादव या दोघांना अटक केली होती. इतरही आरोपी या गुन्ह्यात होते. पुन्हा २०२५ मध्ये याच आरोपींपैकी काहींनी परस्पर कागदपत्र तयार करून मूळ मालकाला बाजूला ठेवत शेतीची खरेदी केली. आता त्यांना शहरातील एका बड्या हस्तीचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच मुख्यालयातून सूत्रधार पळून गेला तरी पोलिस पथक काहीच करू शकले नाही, अशी चर्चा होत आहे.
पोलिसांना टीप देणारा माफियाच्या संपर्कात
एमडी ड्रग्ज व देशी कट्टा बाळगून असल्याची टीप पोलिसांना देणारा खबऱ्या हा भूखंड माफियाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. सातत्याने त्याने पसार शिवाच्या मोबाईलवर कॉल केले आहे. संशयावरूनच एलसीबीने शिवाचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता हे निदर्शनास आले.
न्यायालयापुढे केले जप्त ड्रग्जचे पुन्हा वजन
शहरात एमडी ड्रग्ज व नशेच्या गोळ्यांचे वितरण होत असल्याचा प्रकार पोलिस कारवाईतून उघड झाला आहे. दक्षता पेट्रोलपंपाजवळ केलेल्या कारवाईत पोलिसांना ८८.१० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एक देशी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. याचवेळी पोलिसांनी दोघांना अटक केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची इनव्हेन्ट्री करण्यासाठी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्यापुढे जप्त मुद्देमाल नेण्यात आला. त्याचे मोजमाप करून फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने घेण्यात आले.
३५ लाख रुपये किमतीच्या २१ एकर शेतजमिनीवर डोळा
आठ हेक्टर ४९ आर शेताची बाजार भावाप्रमाणे किमत ३५ लाख रुपये एकर आहे. माफियांनी केलेल्या खरेदीत ६४ लाखांचा व्यवहार दाखविला.