बेंबळा सिंचन घोटाळ्यात जोडले बनावट अनुभव प्रमाणपत्र; कंत्राटदारांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:40 IST2025-12-20T15:34:40+5:302025-12-20T15:40:35+5:30
एसीबीची कारवाई : कालव्याचे काम मिळविण्यासाठी वापरले अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र

Fake experience certificate added to Bembla irrigation scam; Cases registered against contractors
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पातील कालव्याचे काम मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडण्यात आले होते. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशावरून एसीबीने २०१८ पासून याची चौकशी केली. यात तथ्य आढळल्यानंतर यवतमाळ एसीबीचे उपअधीक्षक यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदारांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
सुमित बाजोरिया रा. दर्डानगर, यवतमाळ यांनी बाजोरिया कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावे बेंबळा प्रकल्पाचा मुख्य कालव्याचे ११० ते ११३ किमी अंतरावरील मातीकाम व बांधकाम करण्यासाठी २ कोटी ६४ लाखांची निविदा दाखल केली. २००८ ते २०१२ या कालावधीत हे काम करण्यात आले. कंत्राट मिळविण्यासाठी बाजोरिया यांनी बनावट पूर्व अनुभव प्रमाणपत्र तयार करून ते सिंचन विभागाकडे सादर केले. तसेच लेटर ऑफ ट्रान्समिटल यावर स्वाक्षरी केली. यातून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका एसीबीने ठेवला आहे. याचप्रमाणे सतीश भोयर रा. सत्यनारायण ले-आऊट, अभयकुमार एन. पनवेलकर रा. न्यू उर्वेला कॉलनी कोतवालनगर, नागपूर या दोन कंत्राटदारांनी सुध्दा तीन कोटी ६४ लाखांचे कॅनल मातीकाम मिळविण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याचे एसीबी चौकशीत पुढे आले आहे. यावरून तिघांवरही कलम ४६५,४६६,४७१,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंचन घोटाळ्याची चौकशी एसीबीचे पोलिस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी केली. आता याच प्रकरणात एसीबीचे उपअधीक्षक अभय आष्टेकर यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दोन कंत्राटदारावर दोषारोप दाखल
सिंचन घोटाळ्यात आरोपी असलेल्या दोन कंत्राटदाराविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.
२०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण होऊन भास्कर माने रा. शिवाजीनगर पुणे, संजय काळभोर रा. कवडी पोस्ट मांजरी जि. पुणे या दोन कंत्राटदारावर बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
२०१२ मध्ये गाजला सिंचन घोटाळा
सिंचन प्रकल्पातील कोट्यवधीचे काम मिळविण्यासाठी अनेकांनी खोटे प्रमाणपत्र तयार करून निविदा दाखल केल्या. त्याच आधारावर प्रकल्पाचे काम घेतले. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने एसीबीच्या माध्यमातून चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी सुरू असून एकाच कंत्राटदारावर अनेक गुन्हे दाखल होत असल्याचे प्रकरणी पुढे येत आहेत.
सिंचन घोटाळ्यात जिल्ह्यात आठ एफआयआर
- सिंचन घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून एसीबीने चौकशीत दोषी आढळलेल्या आठ कंत्राटदारांवर यवतमाळ जिल्ह्यात गुन्हे दाखल केले आहेत.
- जवळपास २५ कोटींची कामे आहेत. तर एक कोटी रुपयापेक्षा कमी दराच्या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांची संख्या मोठी आहे. त्यांनीही बनावट अनुभव प्रमाणपत्र जोडल्याचे पुढे आले आहे.
- न्यायालयाच्या आदेशावरून या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.