उडीद व सोयाबीन पिकाचे अतिपावसाने नुकसान

By Admin | Updated: September 28, 2016 00:24 IST2016-09-28T00:24:10+5:302016-09-28T00:24:10+5:30

सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती.

Extreme loss of uradi and soya bean crops | उडीद व सोयाबीन पिकाचे अतिपावसाने नुकसान

उडीद व सोयाबीन पिकाचे अतिपावसाने नुकसान

मदतीची अपेक्षा : तोंडातील घास गेल्याने शेतकरी हवालदिल
सोनखास : सुरुवातीला मौसमी वाऱ्याचा पाऊस यावर्षी समाधानकारक झाल्याने परिसरातील पीक परिस्थिती चांगली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. उडीद व सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे हातातून निघून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे उडीद व सोयाबीनच्या दाण्यांना कोंब फुटत असल्याचे चित्र आहे.
यावर्षी सुुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोनखास परिसरातील पिकांची परिस्थिती उत्तम होती. बहुतांश शेतकऱ्यांनी उडीद व सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. उडीदाचे पीक अतिशय चांगले होते. जवळपास २५ टक्के उडीदाची लागवड होती. काही शेतकऱ्यांची उडीद व सोयाबीनची कापणीही झाली. परंतु आता परतीचा पाऊस थांबतच नसल्याने कापणी केलेला उडीद व सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे. पावसाला सुरुवात झाली की झाकून ठेवा, पाऊस थांबताच या पिकांच्या गंजीला उघडे करा एवढेच काम आता शेतकरी करीत असल्याचे दिसून येते.
कापून ठेवलेल्या पिकाच्या गंजीतील पिकांना अतिवृष्टीमुळे बुरशी चढत आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस राहिल्यास ही पिके हातातून निघून जाण्याची तीव्र शक्यता आहे. उत्तरवाढोणा येथील प्रकाश झांबड या शेतकऱ्याने मक्ता बटईने केलेल्या सहा एकर शेतात उडीदाची लागवड केली. उत्तम स्थितीत असलेल्या पिकाची कापणी करून गंजी लाण्यात आली. परंतु आता पाऊस थांबत नसल्याने २० क्विंटलचे जवळपास ५० हजार रुपयांच्या पिकाचे नुकसान त्यांचे झाले आहे. सोयाबीनच्या दाण्यालाही बुरशी लागत असल्याने ते चिंताग्रस्त आहे. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. यातून मार्ग काढावा कसा हे शेतकऱ्यांना समजेनासे झाले आहे, शासनाच्या कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. हाती आलेले पीक नष्ट होत असताना शेतकऱ्यांना पहावे लागत आहे. शासनाने अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

परतीचा पाऊस थांबता थांबेना
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सोनखास परिसरात चांगलाच कहर केला आहे. अचानक काही वेळ मुसळधार पाऊस येतो आणि नंतर मात्र आकाश स्वच्छ दिसते. पावसाचा वेग पाहता अशावेळी पाच मिनिट जरी पिकांची गंजी ओली झाली तरी त्यामध्ये चांगलेच पाणी मुरते. अशावेळी पिकाच्या गंजीला झाकण्यासाठीसुद्धा पुरेसा वेळ मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Web Title: Extreme loss of uradi and soya bean crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.