लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने हजारो शेतकरी चिंतेत सापडले आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे सोडून आतापर्यंत सोयाबीन खरेदीला तीन वेळा मुदतवाढ दिल्याचे सांगून हात झटकले. त्यामुळे परिवर्तन शेतकरी संघटना आक्रमक झाली.
राज्यात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू होती. ६ फेब्रुवारीला सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने ऑनलाइन नोंदणी केलेल्या ४५ टक्के शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत आहे. मुदतवाढ न दिल्यास मंत्रालयासमोर सोयाबीन फेकले जाईल, असा इशारा मनोहर राठोड यांनी दिला.
सोयाबीन विकायचे कुठे?राज्याचे सोयाबीन उत्पादन हे ६० ते ६५ लाख मॅट्रिक टन आहे. सरकार १३ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करणार आहे तर आतापर्यंत केवळ ७ ते ८ लाख मेट्रिक टनच खरेदी झाली आहे. शिल्लक सोयाबीन शेतकऱ्यांनी कुठे विकायचे, असा सवाल करण्यात आला आहे. बारदाण्याच्या नावाने व्यापाऱ्यांचे सोयाबीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला.
पणनमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये रोषपणन मंत्री जयकुमार रावल मात्र इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात ७ लाख ६४ हजार ७३१ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार ११४ शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मॅट्रिक टन सोयाबीन खरेदी झाल्याचे आकडे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी असा सवाल केला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे.