दूध संकलन केंद्रामुळे उत्साह

By Admin | Updated: April 25, 2015 02:03 IST2015-04-25T02:03:15+5:302015-04-25T02:03:15+5:30

गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतीची दुरावस्था झाली आहे.

Excitement due to milk collection center | दूध संकलन केंद्रामुळे उत्साह

दूध संकलन केंद्रामुळे उत्साह

आर्णी : गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यातील शेतीची दुरावस्था झाली आहे. त्यातच या परिसरात दूध संकलन केंद्रच नसल्यामुळे नागरिकांना या व्यवसायासाठी फारसा फायदा मिळत नव्हता. पंरतु आता आर्णी तालुकयत खासगी दूध संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. अनेकांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध यवसाय नव्याने सुरू केला आहे. आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.
तालुक्यात कोरडवाहू शेती करणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पीक एकाच दिवसात गेल्याचे अनुभव गेल्या दोन वर्षात अनेकदा शेतकऱ्यांना आले. त्यातून मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागले. त्यामुळे दिवसागणिक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत आहे. यामुळे आता केवळ शेती करून चालणार नाही तर त्याला जोडधंदा म्हणून काहीतरी करावे लागेल, या भावनेतून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुधाच्या व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. ज्यांच्याकडे शेती नाही अशीही बरीच मंडळी दुधाचा व्यवसाय करीत असल्याचे आशादायी व सकारात्मक चित्र आर्णी तालुक्यात दिसून येत आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण आडे यांच्या प्रयत्नाने मार्च २०१५ पासून आर्णी येथे एका खासगी कंपनीचे दूध संकलन केंद्र सुरू केले आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद दिसू लागली आहे. पूर्वीसुद्धा आर्णी तालुक्यात दूध संकलन केंद्र होते. परंतु ते चालू शकले नाही. हे बंद पडण्यामागे विविध कारणे आहे. दुधाचे नगदी पैसे त्यावेळी मिळत नव्हते. डेअरीत दिलेले दूध खराब झाल्याचा परस्पर निरोप पाठवून दूध उत्पादकांना पैसेच दिले जात नव्हते. फॅट मोजण्याची या ठिकाणी सुविधा नव्हती. त्यामुळे मग शेतकऱ्यांनीसुद्धा दूग्ध व्यवसाय बंद केला होता. बोटावर मोजण्याइतकीच मंडळी या व्यवसायात तग धरून होती. परंतु आता याची जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. सद्य परिस्थितीत दूधाचे फॅट प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यासमोरच मोजून दुधाचा दर ठरविला जात आहे. यामध्ये अनेकदा म्हशीच्या दुधाला ३२ ते ८५ रुपये लिटरपर्यंत भाव मिळत आहे. तर गाईच्या दुधाला २४ ते ३८ रुपये लिटर भाव मिळत आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बँकेतही पत निर्माण होत आहे. या पारदर्शिपणामुळे दुधाचे उत्पादन वाढून दूध संकलन केंद्रामध्ये आवक वाढली आहे. शेतकरी आता हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहात आहे. दूध विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता भटकण्याची गरज राहिली नाही. सकाळ, संध्याकाळ दोन्ही सत्रात हे संकलन केंद्र सुरू असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आर्णीतील दूध संकलन केंद्रात सध्या आर्णी शहरासह देऊरवाडा पुनर्वसन, हेटी, जवळा, मांगुळ, गणगाव, साकूर, बोरी गोसावी, रुई, वाई, शेंदूरसनी, लोणबेहळ, आसरा, कुऱ्हा, काठोडा, रुद्रापूर, परसोडा, तेंडोळी, उमरी, दाभडी, येरमल हेटी, लाख रायाजी व तालुक्यातील इतरही गावातून तसेच तालुक्याबाहेरून दररोज हजारो लिटर दूध येत आहे. शेतकऱ्यांच्याच पुढाकाराने सध्या हे केंद्र चालविल्या जात आहे. त्यामुळे आपसात नियोजन करून काही शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यासाठी आठवड्याच्या मुदतीत पैसेसुद्धा दिल्या जातात. त्यामुळे हे दूध संकलन केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Excitement due to milk collection center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.