परीक्षा मूल्यांकनाचे पैसे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:03 IST2017-09-07T22:03:14+5:302017-09-07T22:03:28+5:30
दहावी-बारावीचे पेपर तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाºया शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जाते. दुर्दैव म्हणजे, हे तुटपुंजे मानधनही गेल्या सहा महिन्यांपासून बोर्डाने लटकवून ठेवले आहे.

परीक्षा मूल्यांकनाचे पैसे अडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावी-बारावीचे पेपर तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाºया शिक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जाते. दुर्दैव म्हणजे, हे तुटपुंजे मानधनही गेल्या सहा महिन्यांपासून बोर्डाने लटकवून ठेवले आहे. याविरुद्ध आता शिक्षक महासंघाने बोर्डाला कात्रीत पकडल्याने मानधन मिळण्यासोबतच त्यात वाढ होण्याच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यातच पार पडल्या. त्यातील लाखो प्रश्नपत्रिका काटेकोरपणे तपासण्याचे काम शिक्षकांनी पार पाडले. हे काम आपल्यावर लादण्यात येते, अशीच शिक्षकांची भावना असतानाही वरिष्ठांचा आदेश म्हणून शिक्षकांनी काम पूर्ण केले. परंतु, परीक्षा मूल्यांकनात शिक्षकांनी स्वत:हून सहभागी व्हावे, यासाठी परीक्षा मंडळातर्फे प्रयत्न होताना दिसत नाही. उलट त्यांचे मानधन रोखून ठेवण्याचा प्रकार केला जात आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी भरलेले पैसे मंडळाकडे जमा आहेत. तरीही सहा महिन्यानंतर मूल्यांकनाचे पैसे शिक्षकांना मिळालेले नाहीत.
या प्रश्नाची दखल घेत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव अभ्यंकर यांच्या कार्यालयात धडक दिली. शिक्षकांना परीक्षा मूल्यांकनाचे पैसे तत्काळ अदा करण्यात यावे आणि मूल्यांकन शुल्क वाढविण्यात यावे, अशी मागणी शेखर भोयर यांनी केली. याबाबत तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन सचिवांनी दिले आहे.