माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावून २० लाख उकळले
By Admin | Updated: October 26, 2014 22:47 IST2014-10-26T22:47:22+5:302014-10-26T22:47:22+5:30
अश्लील चाळे करण्यास भाग पाडून आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून चक्क माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावण्यात आले. तसेच चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी

माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावून २० लाख उकळले
यवतमाळ : अश्लील चाळे करण्यास भाग पाडून आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून चक्क माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावण्यात आले. तसेच चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन १५ ते २० लाख रुपये उकळले. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहराच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असलेल्या एका माजी नगराध्यक्षाच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या मित्रानेच नादी लावले. तसेच बोळवण करून त्यास अश्लील चाळे करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर या अश्लील चाळ्यांची व्हिडिओ चित्रफीत बनवून आरोपी सुमित शिरोदिया (अग्रवाल) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ याने संबंधित मुलाला ब्लॅकमेल करून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर घरुन पैसे आणण्यासाठी दबाव आणला. गेल्या आठ महिन्यात त्याने ब्लॅकमेलिंगद्वारे १५ ते २० लाख रुपये पीडित मुलाकडून उकळले. एवढेच नव्हे तर एक आलिशान कार खरेदी करून त्याचे मासिक हप्तेही भरायला लावले.
चार दिवसांपूर्वी त्या मुलाच्या घरुन मोठी रक्कम चोरीस गेली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर कुटुंबीयांनी मुलाला विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेतली. या धक्कादायक प्रकाराबाबत कुटुंबीयांनी मुलाला सोबत घेऊन वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली. त्यानंतर शनिवारी उशिरा या प्रकरणात खंंडणी, जीवे मारण्याची धमकी आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. (स्थानिक प्रतिनिधी)