५०० बेडचे स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:34+5:30
शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर यासह अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी हे कोरोना रुग्णालय राहणार आहे.

५०० बेडचे स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात स्वतंत्र कोरोना रुग्णालय उभारण्यात येत आहे. ५०० बेडची व्यवस्था या रुग्णालयात असणार आहे. व्हेंटीलेटरसह सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय दहा दिवसात उभे केले जात आहे. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी रविवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संयुक्त बैठक घेतली.
शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर यासह अत्याधुनिक सुविधा राहणार आहे. वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी हे कोरोना रुग्णालय राहणार आहे. वाशिमच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स व नर्सेसचा ५० टक्के स्टाफ व यवतमाळ मेडिकलमधील डॉक्टर मिळून ६०० जणांची टीम तयार केली आहे. एका युनिटमध्ये ३० बेड असून १४ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची टीम राहणार आहे. गरज पडल्यास खासगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी आयएमएसोबत बैठक घेतली आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णालयात मास्क, सॅनिटायझर्स, कोरोना किटच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली. शासकीय रुग्णालयात एन-९५ मास्क चार हजार १५०, थ्री लेअर साधा मास्क ३२ हजार ७००, कोरोना किट ९५ उपलब्ध असल्याचे डॉ.मिलिंद कांबळे यांनी सांगितले. सॅनिटायझर उपलब्ध नसून डॉक्टर साबणाचा वापर करत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी १६ उपजिल्हा रुग्णालय व ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोनाच्या १५० किट, सॅनिटायझरच्या १७०० बॉटल, थ्री लेअर मास्क ३५ हजार उपलब्ध असल्याचे सांगितले.
मास्क व सॅनिटायझरच्या खरेदीबाबत सूक्ष्म नियोजन करू. त्याची मागणी तत्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर व वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी येत्या दहा दिवसात उर्वरित खाटांच्या रुग्णालयासाठी लागणारी सेवा तातडीने पूर्ण केली जाईल, असे सांगितले. बैठकीला डॉ.बाबा येलके, डॉ.संजय भारती, डॉ.गिरीष जतकर, डॉ.श्रीकांत वºहाडे यांच्यासह पराग पिंगळे, विकास क्षीरसागर आदी उपस्थित होते.
खासगी डॉक्टरांच्या अडचणी जाणून घेणार
यवतमाळ आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजीव जोशी यांच्याशी चर्चा केली असून त्यांना खासगी रुग्णालय सुरू करण्याबाबत निर्देश दिल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा बैठकीत दिली. खासगी डॉक्टरांच्या अडचणीसुद्धा जाणून घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या डॉक्टरांकडून सॅनिटायझर, मास्क व काही कोरोना कीटची मागणी करीत आहे. मात्र या सुविधा प्रशासनाकडून त्यांना पुरविणे सध्या शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.