गटबाजी मिटवा, पक्ष वाढवा
By Admin | Updated: April 13, 2015 01:01 IST2015-04-13T01:01:28+5:302015-04-13T01:01:28+5:30
नेत्यांनी आता अंतर्गत गटबाजीतून बाहेर यायला हवे, पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, भविष्यातील

गटबाजी मिटवा, पक्ष वाढवा
काँग्रेस नेत्यांना साद : पराभवातून धडा घेण्याचा सल्ला
यवतमाळ : नेत्यांनी आता अंतर्गत गटबाजीतून बाहेर यायला हवे, पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, भविष्यातील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी साद काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना घातली.
अलीकडेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्या पुढाकारात झालेल्या एका बैठकीत गटबाजी आणि पक्ष विस्तार या प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांनी गटबाजीचे राजकारण थांबवावे, पक्ष विस्तार व वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यांच्या आवाहनाला उपस्थितांपैकी काहींनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे सांगण्यात येते.
वास्तविक काँग्रेसच्या कार्यक्रमाशिवाय पहिल्यांदाच हे नेते बाहेर एकत्र बसले. कार्यकर्त्यांसाठी ही बाब दिलासादायक ठरणारी आहे. कारण पक्षाच्या व्यासपीठावर हे नेते एकत्र दिसत असलेतरी प्रत्यक्षात त्यांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह लावले जात होते. प्रत्येकजण आपल्या विधानसभा मतदारसंघापुरते राजकारण करीत होते. पक्षाचा जिल्हा किंवा राज्यस्तरावर वाढीच्यादृष्टीने तेवढा विचार करताना कुणी दिसले नाही. नेतेच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाडापाडीचा संदेश पोहोचवित असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात सापडले होते. काठावरील कार्यकर्त्यांचे ठीक मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर आणखीच कोंडी झाली होती. नेतेच गटबाजीला खतपाणी घालत असल्याचे पाहून कार्यकर्ते आणखी विखुरले होते. पुढे हे कार्यकर्ते या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यातील नेत्यांना बसला. काँग्रेसचे हे नेते आपल्या पक्षाचे काम करत आहेत की विरोधी पक्षाचे हेच मतदानाच्या आकडेवारीवरून समजेनासे झाले होते.
आर्णी-केळापूर हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला असताना तेथे लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला तब्बल ६० हजार मतांची आघाडी मिळाली. हीच स्थिती वणी मतदारसंघात होती. काँग्रेसच्या ताब्यातील अन्य मतदारसंघातही विरोधी पक्षाचा उमेदवारच आघाडीवर होता. गटबाजीच्या या राजकारणाचा या नेत्यांना विधानसभेतही फटका बसला. काँग्रेसच्या ताब्यातील पाचही मतदारसंघ भाजपाने हिसकावून घेतले. या पराभवानंतर जमिनीवर आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आता पक्षासाठी विचार करण्याची सवड मिळू लागली. एरवी मतदार तर दूर कार्यकर्त्यांनाही दर्शन दुर्लभ झालेले हे नेते आता मतदारसंघात दिसू लागले आहेत. मतदारांनी जमिनीवर आणल्याने झोप उघडलेल्या या नेत्यांनी पुन्हा पक्षासाठी काहीतरी करण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. त्यातूनच प्रमुख पाच नेत्यांची बैठक झाली आणि त्यात गटबाजी संपविणे, पक्ष वाढविणे, सहकारी तसेच विरोधी पक्षाला रोखणे, आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणे यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मुळात माणिकरावांच्या राजकारणावरच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळतो. लोकसभा निवडणुकीत माणिकराव ‘माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे’ असे सांगत जिल्ह्यातून कायम बाहेर राहिले, तर याच उलट स्थिती विधानसभेत पाहायला मिळाली होती. मुलगा यवतमाळ मतदारसंघात उभा असल्याने माणिकरावांनी बहुतांश वेळ येथेच घालविला. त्यावेळी माणिकरावांकडे राज्याची जबाबदारी नव्हती का, असा प्रश्न आजही कार्यकर्ते विचारित आहेत. माणिकरावांच्याच गटबाजीच्या राजकारणाला येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कंटाळल्याचे दिसून येते. वामनरावांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देण्यासाठी पक्षातीलच चार-पाच चेहरे पुढे करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांचा बोलविता धनी कोण, हे सर्वश्रूत आहे. तरीही वामनरावांनी एकजुटीचे आवाहन या नेत्यांना केले. त्यांना किती प्रतिसाद मिळतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)