पैशाचा खेळ : खेळण्यातल्या हुबेहुब नोटांद्वारे मोठ्यांची फसवणूक यवतमाळ : छोट्या मुलांना खेळण्यासाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या नोटा मुलांचे मनोरंजन करीत आहे. मात्र याच नोटांचा वापर करून काही भामटे भोळ्या ग्राहकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे ‘मनोरंजन बँके’च्या या नोटा मोठ्यांसाठी मनस्तापाचे कारण ठरत आहे. दोन हजार आणि पाचशेच्या नव्या चलनी नोटा आल्या आहेत. दोन हजाराची नोट देऊन व्यवहार करताना चिल्लरचे वांदे होत असले तरी या नोटेविषयी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षणही आहे. छोट्यांचे तर विचारायलाच नको. हाच धागा धरून छोट्यांना खेळण्यासाठी म्हणून बाजारात काही नोटा विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने नव्या दोन हजार आणि पाचशेच्या नोटांच्याच हुबेहुब नोटा तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर महात्मा गांधींच्या मुद्रेपासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या वचनापर्यंत सर्व मजकूर हुबेहुब आहे. त्यामुळे पाहताक्षणी या नोटा खेळण्यातल्या असाव्या, याची शंकाही येत नाही. केवळ एका कोपऱ्यात लिहिलेले ‘मनोरंजन बँक’ एवढे शब्दच या नोटेचा नकलीपणा उघड करतात. पण तो मजकूर सहसा दिसत नाही. यवतमाळच्या बसस्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी अज्ञात भामट्याने एका ग्राहकाला चक्क हिच खेळण्यातली नोट देऊन दोन हजारांनी फसवणूक केली. त्यापाठोपाठ आणखी एकाला पाचशेची खेळण्यातली नोट देऊन गंडविण्यात आले. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘मनोरंजन बँकेच्या’ नकली नोटा बंद करण्याची मागणी पुढे आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
‘मनोरंजन बँके’चा ग्राहकांना मनस्ताप
By admin | Updated: February 13, 2017 01:17 IST