वणी (यवतमाळ) : केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील एका किराणा व्यावसायिकाच्या घरात शिरून पिस्तूल रोखत जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून पाटणबोरीत या घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी रात्री ९.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाटणबोरीतील किराणा व्यावसायिक वासुदेव उपलेंचवार हे त्यांच्या पत्नीसह वार्ड क्रमांक चारमध्ये वास्तव्याला आहेत. ६ ऑगस्टला रात्री ९.२० वाजताच्या सुमारास जेवण केल्यानंतर वासुदेव उपलेंचवार घरातील व्हॉलमध्ये टिव्ही पाहत बसून होते. यावेळी दाराला आतून कडी लावलेली नव्हती. याचवेळी एक लाल टी-शर्ट परिधान केलेला व चेहऱ्यावर पांढरा रूमाल बांधलेला अज्ञात लुटारू वासुदेव उपलेंचवार यांच्या घराच्या आवारात शिरला. त्यानंतर त्याने दरवाजा ढकलून हॉलमध्ये प्रवेश केला. वासुदेव उपलेंचवार यांनी त्याला कोण आहे? कशाला आला? याबाबत विचारणा केली असता, त्याने पिस्तूल काढून उपलेंचवार यांच्यावर ताणली. बंदूक ताणताच वासुदेव उपलेंचवार यांना काही सुचले नाही. त्यांनी थेट त्याला दरवाजातून धक्का देऊन बाहेर पोर्चवर पाडले आणि दरवाजा आतून कुंडी लावून घेतला. त्यानंतर दरवाजाच्या बाजुला असलेल्या काचेमधून चोर कुणीकडे गेला, याची पाहणी केली. मात्र तो नंतर दिसला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर डॉ. प्रवीण उपलेंचवार व सोनू पवार व अन्य काही नागरिक उपलेंचवार यांच्या घरी पोहोचले. मात्र त्या ठिकाणी चोर दिसला नाही.
मजुरावर आली शंकाघराच्या मागील बाजुला मोनू पवार यांच्या घराच्या बांधकामावर मजूर राहतात. हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील आहेत. तेथे जाऊन बघितले असता, एक युवक लाल टी शर्ट घातलेला दिसून आला. त्या युवकाच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या होत्या. त्याला विचारपूस केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. या घटनेची माहिती रात्रीच पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीला विचारपूस केली. रात्री १ वाजता वासुदेव उपलेंचवार यांनी याप्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास एपीआय पेंढारकर हे करीत आहेत. पाटणबोरी येथे रात्री दोन पोलिसांची ड्युटी लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पाटणबोरी येथे पोलीस आऊट पोस्टला रात्री कोणीही राहत नसल्याने पाटणबोरीत गुन्हे वाढू लागले आहेत.