अनाथांच्या पुनर्वसनासाठी अभियंता सागरची धडपड
By Admin | Updated: October 22, 2014 23:25 IST2014-10-22T23:25:56+5:302014-10-22T23:25:56+5:30
लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने

अनाथांच्या पुनर्वसनासाठी अभियंता सागरची धडपड
प्रकाश लामणे ल्ल पुसद
पुसद : लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरविलं. अनाथाश्रमाच्या आश्रयात बालपण गेलं. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तेथूनही बाहेर पडाव लागलं. पुढे काय या विवंचनेत एक तरुण उभा राहिला. संघर्ष करीत त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली. आपल्या सारख्याच अनाथ असलेल्या अनेकांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्याने धडपड सुरू केली. आज त्याने ४८० अनाथ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. सामाजिक जाणीव असलेल्या या तरुणाचे नाव आहे, सागर रेड्डी.
नवी मुंबईतील एल अॅन्ड टी कंपनीत प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून २६ वर्षीय सागर काम करतो. राज्यभरातील अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर प्रवास सुरू केला आहे. त्याअंतर्गत पुसद येथे आला असता ‘लोकमत’शी बोलत होता. सागरने एकता निराधार संघ स्थापन केला आहे. त्या माध्यमातून ठाणे, मुंबई, वाशी, पुणे येथील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तो धडपडत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवर या विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याला करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे, असे सांगत पोटतिडकीने सांगतो. सागर हा मूळचा आंध्रप्रदेशातील. सागरचे आई-वडील मुंबईत उच्च शिक्षणासाठी होते. वडील व्यंकटेश रेड्डी यांनी महाराष्ट्रीय तरुणी पौर्णिमा काळे हिच्यासोबत प्रेमविवाह केला. त्यांच्या संसारवेलीवर सागरच्या रुपाने फुल उमलले. सुखाचा संसार सुरू असताना काळाची दृष्ट नजर लागली. सागर अडीच वर्षाचा असताना प्रेमविवाह प्रकरणातून या दाम्पत्याची आंध्रप्रदेशात हत्या करण्यात आली. सागर अनाथ झाला. त्यानंतर आला तो लोणावळाच्या आंतरभारती अनाथालयात तेथेच वयाच्या १८ वर्षापर्यंत त्याचे लालन-पालन झाले.
मात्र १८ वर्ष पूर्ण झाले की आश्रमातून बाहेर पडावे लागते. सागर समोरही हाच प्रश्न निर्माण झाला. मात्र परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या सागरने परिस्थितीवर मात करीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एल अॅन्ड टी कंपनीत नोकरीही मिळाली. मात्र आपल्या वाट्याला आलेला अनाथाचा प्रवास इतरांच्या वाट्याला येऊ नये, अनाथांचे शिक्षण व्हावे म्हणून एकता निराधार संघ स्थापन केला. अनाथ तरुणांना एकत्र करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी स्वत:च्या वेतनातील पैसे तो खर्च करतो. सुटीत वेळ काढून अनाथांच्या पंखात बळ भरण्याचे काम करतो. आता तो राज्यातील दानशुरांंना आव्हान करीत असून अनाथांच्या हक्कासाठी धडपडत आहे.