मतदान यंत्राची अंत्ययात्रा
By Admin | Updated: January 20, 2015 22:42 IST2015-01-20T22:42:56+5:302015-01-20T22:42:56+5:30
मतदान यंत्राच्या गैरवापराने मतदारांच्या मतांचे हनन केल्याचा आरोप करीत बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने मतदान यंत्राची यवतमाळ शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

मतदान यंत्राची अंत्ययात्रा
बहुजन मुक्ती पार्टी : मतदारांच्या मतांचे हनन केल्याचा आरोप
यवतमाळ : मतदान यंत्राच्या गैरवापराने मतदारांच्या मतांचे हनन केल्याचा आरोप करीत बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने मतदान यंत्राची यवतमाळ शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. वाजंत्री आणि रामनाम सत्य हैच्या घोषणेत काढण्यात आलेली ही अंत्ययात्रा शहरात चर्चेचा विषय झाली.
येथील आझाद मैदानाजवळील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गाने जात ही अंत्ययात्रा बसस्थानक चौकात जाऊन समाप्त झाली. मतदान यंत्राचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने मतदान यंत्राला पेपर ट्रेल बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र निवडणूक आयोगाने न्यायालयाची दिशाभूल करीत मोजक्याच ठिकाणी सदर यंत्र बसविले. त्यामुळे निवडणूक आयोगावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरण्यात यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पार्टीचे अध्यक्ष इंदल राठोड यांनी केले. यावेळी राजेंद्र देठे, अॅड. अनिल किनाके, अॅड. खुशाल शेंडे, गजानन गोडवे, डॉ. सुरेंद्र ठमके, गणपत गव्हाळे यांच्यासह अनेक नागरिक या अभिनव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)