गरिबांवरच अतिक्रमणाचा बुलडोझर
By Admin | Updated: January 4, 2015 23:19 IST2015-01-04T23:19:50+5:302015-01-04T23:19:50+5:30
शासकीय अथवा सार्वजनिक जागेत झालेल्या कोणत्याच अतिक्रमणाचे समर्थन करता येत नाही. धनदांडगे व्यावसायीक आणि पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर धडपणारे अशी विरोधाभासी स्थिती आहे.

गरिबांवरच अतिक्रमणाचा बुलडोझर
धनदांडग्यांना अभय : अनधिकृत व्यापारी संकुल आणि बांधकामाचा वाढतोय विळखा
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
शासकीय अथवा सार्वजनिक जागेत झालेल्या कोणत्याच अतिक्रमणाचे समर्थन करता येत नाही. धनदांडगे व्यावसायीक आणि पोटाची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर धडपणारे अशी विरोधाभासी स्थिती आहे. अतिक्रमणाची मोहीम नेहमीच फुटपाथपासून सुरू होते, ती धनदांडग्यांच्या अतिक्रमणापर्यंत पोहोचतच नाही, हा आजवरचा अनुभव आहे. शनिवारची अतिक्रमण हटाव मोहीमसुध्दा फुटपाथपासूनच सुरू झाली. आता ही मोहीम थांबविण्यासाठी राजकीय दबाव वाढत आहे.
अतिक्रमणाच्या अजगरी विळख्याने शहरात अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेताच राजकीय धुरीणांना आयता मुद्दा मिळाला आहे. मुळात कुणाच्याही भावनिकतेचे राजकीय भांडवल करण्याची संधी राजकारणी सोडत नाहीत. कायद्याचा बडगा असल्याने उघडपणे कोणी पुढे येत नसले, तरी आतून या मोहिमेचा प्रखर विरोध केला जातो. जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम सुध्दा अशाच राजकीय खेळीचा बळी ठरत आहे. यात केवळ भरडला जातो तो रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारा गरीब व्यवसायीक. समानतेच्या नावाखाली राज्यकर्तेही धनदांडग्याच्या हिताचेच संरक्षण करताना दिसतात.