अकरावी प्रवेशाचा तीढा सुटला
By Admin | Updated: June 28, 2014 23:48 IST2014-06-28T23:48:07+5:302014-06-28T23:48:07+5:30
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना

अकरावी प्रवेशाचा तीढा सुटला
विद्यार्थी क्षमता वाढली : १३ जुलैपर्यंत चालणार प्रवेश प्रक्रिया
यवतमाळ : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ३१ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुकर करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने सातत्याने बैठका घेवून शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचना दिल्या. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा हा मागील वर्षी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पाच हजार ३८९ विद्यार्थी अधिक आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी तुकड्यांमधील क्षमता वाढविण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून ३४ हजार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश देता येईल एवढी व्यवस्था केल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा, सर्व कंटक मंडळांनी चालविलेले उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांची अकरावी प्रवेशाची विद्यार्थी क्षमता ३४ हजार इतकी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात कला शाखेच्या २७५ तुकड्या असून १८ हजार ७२० विद्यार्थी क्षमता, विज्ञान शाखेच्या ११९ तुकड्या असून आठ हजार १४० विद्यार्थी क्षमता, वाणिज्य शाखेच्या २२ तुकड्या असून एक हजार ७४० विद्यार्थी क्षमता तसेच संयुक्त शाखेच्या १५ तुकड्या असून एक हजार २६० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. २०१३-१४ च्या शैक्षणिक सत्रात अकरावीच्या या तुकड्यांमध्ये २५ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्याहीवेळेस विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाकरिता जागा उपलब्ध होती. आता तर प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी एस.जी. वसावे यांनी संयुक्त बैठक घेवून अकरावी प्रवेशाचे नियोजन केले आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया १३ जुलैपर्यंत राबविली जाणार आहे.
या प्रक्रियेत अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांसाठी गोदणी मार्गावर असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे प्रभारी शिक्षणाधिकारी एस.जी. वसावे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)