अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:14 IST2017-10-06T23:13:52+5:302017-10-06T23:14:03+5:30
‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे.

अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे. लोहारा येथे दिवसाढवळ्या सुरू असलेला प्रकार पुढे आला आहे. आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे वीज चोरी होत आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान विद्युत कंपनीपुढे आहे.
बेंबळाचे पाणी आणून यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेतून यासाठीची तयारी सुरू आहे. शहराच्या विविध भागात नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. पाच ते सोळा लाख लिटरपर्यंतच्या टाक्या उभ्या केल्या जात आहे. मात्र या कामांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून घेण्यात आलेल्या नाही. बांधकामासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असलेले पाणी घेण्यासाठीच्या सोयी नाममात्र आहे. यातूनच वीज चोरीसारखे प्रकार होत आहे.
लोहारा मार्गावर असलेल्या वसंत गृहनिर्माण सोसायटी परिसरातील अंगणवाडी केंद्रामागे पाण्याची टाकी बांधली जात आहे. याच ठिकाणी मोठी विहीर आहे. त्यातील पाणी या कामासाठी घेण्यात येत आहे. तीन-चार दिवसांपासून काँक्रिटच्या कामाला हात लागला आहे. या कामांसाठी तारावर आकोडे टाकून वीज वापरली जात आहे. या भागात वस्ती आहे. नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. तरीही आकोडे टाकून वीज वापरण्यात येत आहे. टाकीचे बांधकाम बरेच महिने चालणार आहे. त्यासाठी पाणी आवश्यक आहे. काम पूर्ण होईपर्यंत चोरीचीच वीज वापरली जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्वच ठिकाणी बोंबाबोंब
योजनेच्या कामासाठी पाणी आवश्यक आहे, हे माहीत असतानाही कंत्राटदार कंपनीने कुठेही विजेचे मीटर घेतलेले नाही. खुद्द विद्युत कंपनीची ही माहिती आहे. पाणी टँकरने आणले तरी वर चढविण्यासाठी दाब आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. शहरात आठ ते नऊ टाक्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कंपनीने काय उपाययोजना केल्या, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. शासकीय योजनेच्या कामासाठी वीज चोरीचा प्रकार अयोग्य आहे.
अजय बेले, प्रभारी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ