महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द
By Admin | Updated: April 2, 2015 00:05 IST2015-04-02T00:05:15+5:302015-04-02T00:05:15+5:30
तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द
नामांकन प्रक्रिया सुरू : ३८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी कायम
महागाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पैकी ३८ ग्रामपंचायतींची रणधुमाळी मात्र कायम असून, त्यासाठी ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करावयाचे आहेत. घोनसरा, कान्हा, सारखणी आणि कवठा या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, त्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ८ एप्रिल रोजी छाणणी, १० ला विड्रॉल आणि २२ ला मतदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गावागावात बैठका सुरू झालेल्या असून, बहुतांश ठिकाणी सदस्य संख्या वाढलेली असून, वार्डाचे नव्याने गठन करण्यात आलेले असल्यामुळे हमखास आता मीच निवउून येतो असे कोणीही छाती ठोपणे सांगु शकत नाही.
सारेच गावपुढारी संभ्रमात पडले आहेत. गावावर आपले किंवा आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना पॅनल प्रमुखाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विकास फंडामुळे अतिशय महत्व प्राप्त झाले असून, सरपंच होण्यासाठी अनेक पुढारी आता पासूनच कंबर कसून बसले आहेत.
पॅनल तयार करणे आणि तयार झालेल्या पॅनलसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे यातच बरीच धांदल उडत असून, राखीव जागेसाठी काही ठिकाणी जात पडताळणी नसल्यामुळे उमेदवार मिळेनासे झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाईचे सावट असूनही निवडणुकीचा ज्वर चढल्यामुळे नागरिक आणि गाव पुढारी सारेच पाणीटंचाईचे चटके सहन करून गावागावात कॉर्नर बैठका घेण्यात मग्न झाले आहेत. तर जो कुणी पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आश्वासन देर्ईल, त्यालाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)