सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: July 28, 2016 01:10 IST2016-07-28T01:10:54+5:302016-07-28T01:10:54+5:30
शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही.

सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या
अभियान कुचकामी : बँका धरताहेत वेठीस
महागाव : शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही. गत सात महिन्यात महागाव तालुक्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बळीराजा चेतना अभियान आणि अन्न सुरक्षा योजनाही तालुक्यात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
महागाव तालुक्यात तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान दाखविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गहू, तांदूळ अत्यल्प दरात दिले जाते. परंतु आजही महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचला नाही. परिणामी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांची कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले.
अपवाद वगळता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात डाळदाणा आढळून आला नाही. शेतातील पिकांच्या फवारणीसाठी पैसा नाही. सावकाराचे कर्ज अंगावर असणे, बँका कर्ज द्यायला तयार नाही.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील किसन भागोराव नरवाडे या शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. पूर्वीचे कर्ज वसूल करून घेतल्यानंतर बँक कर्जाचे पुनर्गठन करायला तयार नाही. त्यामुळे खचून गेलेल्या किसनने इच्छा मरणाची मागितली होती. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तालुक्याला तीनदा भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तालुक्यात फेल ठरल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)