रस्त्यांना जड वाहतुकीचे ग्रहण

By Admin | Updated: May 29, 2014 02:52 IST2014-05-29T02:52:46+5:302014-05-29T02:52:46+5:30

ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते हे खर्‍या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण जीवनाला बर्‍याच अंशी कलाटणी मिळाली आहे.

Eclipse of heavy traffic on the roads | रस्त्यांना जड वाहतुकीचे ग्रहण

रस्त्यांना जड वाहतुकीचे ग्रहण

यवतमाळ : ग्रामीण भागातील गाव जोड रस्ते हे खर्‍या अर्थाने विकासाचे द्योतक आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण जीवनाला बर्‍याच अंशी कलाटणी मिळाली आहे. तालुका, जिल्हा या ठिकाणी सहज ये-जा करण्यासाठी हे रस्ते रक्तवाहिनीचेच काम करत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गाव जोड रस्त्यांना क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांचे ग्रहण लागले आहे. यामुळे काही आठवड्यातच रस्ते उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येते.

साधारणत: ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ १0 टन वजनाच्या वाहतुकीसाठी योग्य असतात. सरासरी लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र या आधारावर या रस्त्यांची क्षमता निश्‍चित केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक होत आहे. काही ठिकाणी कोळसा खदानी, विटभट्टी, चुना भट्टी, सिमेंट फॅक्टरी उभारण्यात आल्या आहे. विशेष करून वणी, मारेगाव, झरी या तालुक्यांमध्ये हे खाण उद्योग केंद्रित झाले आहे. या गाव जोड रस्त्यावरून ३0 ते ४0 टन वजनाचे ट्रक ये-जा करतात. क्षमतेच्या दुप्पट वजन रस्त्यावरून नेण्यात येत असल्यामुळे काही आठवड्यातच हा रस्ता पूर्णत: नष्ट होतो. यामध्ये ग्रामीण भागातील वाहतूकही विस्कळीत होते. शिवाय जिल्हा परिषदेकडून मूलभूत सुविधेत अंतभरूत रस्ता वेळेच्या आधीच नष्ट होतो. यामुळे जिल्हा परिषदेच्या रस्ते निधीचाही अपव्यय होत आहे.ग्रामीण भागातील रस्ते नष्ट झाल्याने परिवहन महामंडळाने कित्येक गावांच्या बसफेर्‍या बंद केल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांंंना पायपीट करत यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eclipse of heavy traffic on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.