उर्ध्व पैनगंगा उमरखेडसाठी दिवास्वप्न
By Admin | Updated: February 17, 2017 02:31 IST2017-02-17T02:31:11+5:302017-02-17T02:31:11+5:30
विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले.

उर्ध्व पैनगंगा उमरखेडसाठी दिवास्वप्न
कालव्यांची समस्या : शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेच नाही
उमरखेड : विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम उमरखेड तालुक्यातील शेती सिंचनासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यासाठी कालव्याचे जाळे विणण्यात आले. परंतु गेल्या ३० वर्षात आजही या कालव्याचे पाणी टेलपर्यंत पोहोचले नाही. उमरखेड तालुक्यासाठी उर्ध्व पैनगंगा हा प्रकल्प दिवास्वप्न ठरत आहे.
पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे ७० टक्के पाणी मराठवाड्यात जाते तर उर्वरित पाणी पुसद आणि उमरखेड तालुक्यात येते. या प्रकल्पातून समृद्धी येईल, अशी अपेक्षा उमरखेड तालुक्यातील नागरिकांना होती. परंतु हा प्रकल्पच आता अभिशाप ठरत आहे. उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी पैनगंगेच पात्र कधीही कोरडे होत नव्हते. १२ ही महिने नदीपात्रात पाणी वाहात होते. परंतु पैनगंगा नदीवर धरण झाले आणि नदीचे पात्र कोरड पडू लागले. उन्हाळा आला की, पैनगंगेचे पात्र कोरडे होत तर पावसाळ््यात अतिरिक्त पाणी सोडल्याने कृत्रिम पूर येऊन नदीतिरावरील शेकडो नागरिकांना फटका बसतो. गत ३० वर्षापासून हीच परिस्थिती कायम आहे. पैनगंगेच्या महापुराचा तडाखा अनेक गावांना बसला आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे जाळे उमरखेड तालुक्यात तयार करण्यात आले. परंतु कालव्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कालव्यात ठिकठिकाणी झुडपी वनस्पती वाढली असून, अनेक ठिकाणी कालवे जमीनदोस्त झाले आहे. काही ठिकाणी कालव्यातील पाणी बाहेर जाऊन अनावश्यक शेतीक्षेत्रात शिरते. त्यामुळे पाणथळ निर्माण होऊन पिकांचे नुकसान होते. कालव्याच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी येतो. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने कालवे दुरूस्त झाले नाही.
इसापूर धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. परंतु आजही या डाव्या कालव्यातून पाणी मिळत नाही. कंत्राटदार, अधिकारी आणि मध्यस्थांनी या कालव्याची पूर्णत: वाट लावली आहे. १९ हजार हेक्टर सिंचन क्षमता असताना अद्यापही पूर्ण क्षमतेने या प्रकल्पातून ओलित करता आले नाही. इसापूर येथील प्रकल्पातून पाणी सोडण्यातही दुजाभाव होत असल्याची कायम ओरड असते. या कालव्याच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेऊन उमरखेड तालुका सुजलाम, सुफलाम करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे. (कार्यालय चमू)