स्वेच्छानिवृत्ती अर्ज देऊन दारव्हा ठाणेदार अचानक आजारी रजेवर
By Admin | Updated: June 15, 2017 00:56 IST2017-06-15T00:56:04+5:302017-06-15T00:56:04+5:30
येथील ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी बुधवारी अचानक स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठांना सादर करून ठाण्याचा प्रभार सोडला.

स्वेच्छानिवृत्ती अर्ज देऊन दारव्हा ठाणेदार अचानक आजारी रजेवर
नागरिकांचा रास्ता रोको : कायम राहण्यासाठी एसडीपीओंना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी बुधवारी अचानक स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठांना सादर करून ठाण्याचा प्रभार सोडला. याला कडाडून विरोध करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली.
गेल्या दीड वर्षांपासून अनिलसिंग गौतम दारव्हाचे ठाणेदार म्हणून कार्यरत आहे. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. अनेक प्रतिष्ठीतांना त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ताटकळत ठेवले आहे. यामुळे सतत त्यांच्याविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यातच बुधवारी गौतम यांनी अचानक आपल्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. लगेच त्यांनी वैद्यकीय रजा घेऊन पोलीस ठाण्याचा प्रभारही सोडला.
ही वार्ता शहरात पसरताच अनेक नागरिकांनी ठाण्याकडे धाव घेऊन गौतम यांची भेट घेतली. त्यांना स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र गौतम यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे निराश झालेल्या अनेक नागरिकांनी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शहरासह तालुक्यातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान नागरिकांनी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या भावना कळविल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आपल्या कार्यपद्धतीमुळे पोलीस दलात चर्चेचा विषय ठरलेले गौतम यांनी अचानक निवृत्तीचा अर्ज सादर केल्याने विविध चर्चेला उधाण आले.