दारूच्या नशेत काकाची खलबत्ता डोक्यात घालून हत्या; पुतण्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 20:32 IST2023-06-30T20:31:52+5:302023-06-30T20:32:24+5:30
Yawatmal News पुतण्याने दारूच्या नशेत काकाच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे घडली.

दारूच्या नशेत काकाची खलबत्ता डोक्यात घालून हत्या; पुतण्याला अटक
यवतमाळ: पुतण्याने दारूच्या नशेत काकाच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे घडली. डोक्यात दगड घातल्याने काका जागीच ठार झाला. मात्र एवढे होऊनही पुतण्याचे समाधान झाले नाही. त्याने घरातून विळा आणून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काकावर विळ्याने सपासप वार केले. या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
सुभाष संभाजी पचारे (५०) रा. कोसारा असे घटनास्थळीच ठार झालेल्या काकाचे नाव आहे, तर मोहन ऊर्फ चंपत देवीदास पचारे (३२) रा. कोसारा असे निर्दयी पुतण्याचे नाव आहे. अगदी तारुण्यातच दोघेही काका-पुतण्या दारूच्या आहारी गेले. त्यामुळे मृत सुभाष पाचारे यांची पत्नी त्याला सोडून १५ वर्षापासून मुलांसह माहेरी राहते. तर हत्या करणारा मोहन पचारे हासुद्धा दारूच्या आहारी गेल्याने त्याचीही पत्नी एक वर्षापासून माहेरीच राहते. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही मिळून दारू पीत असत.
परंतु मृत काका सुभाष पचारे हा गेल्या आठ दिवसांपासून पुतण्या मोहन हा माझा खून करणार आहे, याला माझ्यापासून दूर करा, असे गावातील अनेकांना सांगत होता. परंतु हे दोघेही व्यसनी असल्याने त्यांचे बोलणे कुणीही मनावर घेतले नाही. दरम्यान, ३० जूनच्या सकाळी काका व पुतण्या दोघांनीही घरी सोबत मद्यप्राशन केले. काही वेळाने दोघांत वाद झाला. शाब्दिक वादाने उग्ररूप धारण केले. शेजाऱ्यांनीही नेहमीची भानगड म्हणून लक्ष दिले नाही. वाद इतका विकोपाला गेला की, पुतण्या मोहनने काका सुभाषच्या डोक्यात बाजूलाच असलेला दगडी खलबत्ता घातला. यात सुभाष जागीच ठार झाला. आरोपी मोहनचे एवढ्याने समाधान न झाल्याने त्याने बाजूलाच पडून असलेल्या विळ्याने सुभाषवर सपासप वार करून त्याच्या शरीराची अक्षरश: चाळण केली.
खुनाचा गावकऱ्यांना पत्ताच नाही
खून झालेल्या स्थळाला लागूनच रेशनचे दुकान आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणी काही नागरिक होते. परंतु कोणालाही या खुनाच्या घटनेची भणक लागली नाही. थोड्या वेळाने मारेकऱ्यानेच याची माहिती गावकऱ्यांना दिली. या घटनेने गावात खळबळ निर्माण झाली. गावातील पोलिस पाटील यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी मारेकरी मोहन याला ताब्यात घेतले. घटनास्थळी ठाणेदार राजेश पुरी यांनी भेट देऊन खुनात वापरलेले साहित्य जप्त केले. या प्रकरणी भादंवि ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.