साडीच्या पदराने सांडली दारू, बायकोला बेल्टने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 17:21 IST2021-12-03T16:10:33+5:302021-12-03T17:21:53+5:30
दारूचा पेला भरून तो तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडून रिकामा झाला. यामुळे संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली.

साडीच्या पदराने सांडली दारू, बायकोला बेल्टने केली मारहाण
यवतमाळ : घरात दारूचा फक्कड बेत रचला आणि दारू घेण्यासाठी त्याने पेलाही भरला. मात्र, तेवढ्यात बायकोच्या साडीचा धक्का ग्लासला लागून दारू सांडल्याने संतप्त झालेल्या तळीरामाने बायकोला बेल्टने मारहाण केली. याप्रकरणी नवरोबाविरोधात पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळापूर तालुक्यातील घोडदरा येथील प्रमोद श्यामराव वाघाडे (३२) हा सायंकाळच्या सुमारास दारू पिण्यासाठी घरामध्येच बसला होता. दारूचा पेला भरून त तोंडाला लावणार इतक्यात बाजूने जात असलेल्या बायकोच्या साडीचा पदर ग्लासला लागला आणि ग्लास खाली पडल्याने दारूचा पेला रिकामा झाला.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रमोदने बायकोला शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. यात ती जबर जखमी झाली. तिने पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कलम ३२४, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.