सात हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: June 28, 2014 01:21 IST2014-06-28T01:21:28+5:302014-06-28T01:21:28+5:30
तालुक्यात १६ व १७ जूनला झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

सात हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट
दारव्हा : तालुक्यात १६ व १७ जूनला झालेल्या पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच मान्सूनपूर्व कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र त्यानंतर हवामानात कुठलाही बदल न झाल्यामुळे पाऊस लांबला. परिणामी सात हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
कृषी केंद्रांमधून बीटी बियाण्यांचे साडेसहा कोटी रुपये किमतीचे ७० हजार पॅकेट, साडेबारा कोटींच्या सोयाबीनच्या ५० हजार बॅग आणि २५ कोटी रुपये किमतीच्या रासायनिक खतांची विक्री झाली आहे. यामधून ७० टक्के कापूस व ३५ ते ४० टक्के सोयाबीनची पेरणी झाल्याचा अंदाज आहे. या पेरण्या उलटल्यामुळे जवळपास ३५ ते ४० कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
खरीप हंगामाची चाहुल लागताच शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करून ठेवली होती. मान्सूनच्या बातम्या आल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली. १६ व १७ जूनला थोडाफार पाऊस पडला. यामुळे मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा दिला. याच वेळी कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा पेरणी केली. मात्र पाऊस गायब झाल्याने अनेकांनी गुंडाने पाणी टाकून रोपे जगविण्याचा प्रयत्न केला. नदी-नाले कोरडे झाल्यामुळे पाण्याचे स्त्रोतही आटले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही. आधीच गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व खते कसे आणावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हादरला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पावसाचा अंदाज चुकल्यामुळे पाण्यात गेले असून दुबार पेरणीसाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (शहर प्रतिनिधी)