दुष्काळातील उपाययोजना थंडबस्त्यात
By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-28T01:20:55+5:302014-06-28T01:20:55+5:30
गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली.

दुष्काळातील उपाययोजना थंडबस्त्यात
यवतमाळ : गतवर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे तिनही हंगामात पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणात आणेवारी ४६ टक्के निघाली. प्रशासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला. मात्र त्यावरील उपाययोजना अजूनही झालेल्या नाही. यावर तत्काळ कारवाई व्हावी यासह यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे, खते आणि कीटकनाशक अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
पावसाला विलंब झाल्याने वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात चारा डेपो उघडण्यात आले नाही. त्यामुळे पशुधन पालकांपुढे जनावरे सांभाळण्याची चिंता आहे. जून महिना संपत असतानाही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. १७ जूनला झालेल्या पावसामुळे ५० टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र यानंतर वरुणराजा रूसल्याने बियाणे करपले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. अशा स्थितीत त्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गतवर्षी कृषी विभागाने उतरविलेल्या पीक विम्याच्या रँडम पद्धतीमुळे सलग तीन वर्षे उंबरठा उत्पादन कमी आले. त्यामुळे नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, प्रलंबित वीज जोडण्याची कारवाई पूर्ण करावी, सिरसगाव पांढरी येथील युनियन बँकेने पीक कर्जातून कपात केलेल्या पीक विम्याच्या रकमेचा लाभ १५ वर्षांपासून मिळाला नाही तो तत्काळ द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करताना जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, विलास बोनकिले, सदाशिवराव गावंडे, विनायकराव भेंडे, मोहन खोडके, दिलीप खडसे, रमेश रंगारी, प्रदीप भगत, विनायकराव अघम, केशव मोहरकर, नितीन भोकरे, अजिंक्य मासाळ, मनोज पवार, परशराम राठोड, अनिल चव्हाण, नितीन गुघाणे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)