चालक प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी नोकरीपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:19+5:30
आदिवासी विकास विभागामार्फत चालक प्रशिक्षणासाठी मोठा निधी खर्च केला जातो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना एसटी बस चालविण्यासाठी तरबेज केले जाते. चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या सेवेत चालक म्हणून नोकरी मिळणे अपेक्षित आहे.

चालक प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी नोकरीपासून दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा चालक प्रशिक्षण केंद्रातून ‘पास’ झालेले विद्यार्थी मागील सहा वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. एसटीच्या यवतमाळ विभागात आदिवासी प्रवर्गासाठीची ४७४ पदे आहेत. सरळसेवा भरतीने या जागा भरण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत चालक प्रशिक्षणासाठी मोठा निधी खर्च केला जातो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना एसटी बस चालविण्यासाठी तरबेज केले जाते. चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या सेवेत चालक म्हणून नोकरी मिळणे अपेक्षित आहे. सन २०१४ पासून ४६, ४७, ४८, ४९ व ५० मधील १५० ते २०० उमेदवारांची अंतिम चालक चाचणी पांढरकवडा चालक प्रशिक्षण केंद्रात पूर्ण झालेली आहे. मुंबईतील कमिटीमार्फत या प्रशिक्षित चालकांमधून महामंडळाच्या सेवेत उमेदवारांना दाखल करून घेतले जाते. परंतु या कमिटीचेही दुर्लक्ष सुरू आहे. अंतिम चाचणीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित का ठेवले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
प्रशिक्षण पूर्ण होऊनही गेली सहा वर्षांपासून नोकरी मिळत नसल्याने या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर तसेच महामंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु याची दखल घेण्यात आली नाही. नोकरीच्या अपेक्षेने आदिवासी समाजातील युवकांनी एसटी बस चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. उमेदीच्या काळात महामंडळाच्या सेवेत काम मिळेल, अशी अपेक्षा त्यांना असतानाच गेली सहा वर्षांपासून नोकरी नसल्याने त्यांच्यात हतबलतेची भावना निर्माण झाली आहे. प्रशिक्षण घेऊन उपयोग काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
महामंडळात कामगारांची टंचाई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) चालकांची टंचाई असल्याची ओरड केली जाते. बसफेऱ्या रद्द होण्याला ही बाबही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तरीही चालकांची पदभरती का केली जात नाही, हा प्रश्न प्रशिक्षण घेतलेल्या या आदिवासी उमेदवारांकडून विचारला जात आहे.