ट्रॅक्टर विहिरीत पडून चालक ठार
By Admin | Updated: April 25, 2015 01:53 IST2015-04-25T01:53:55+5:302015-04-25T01:53:55+5:30
शेतात नांगरणी करणारा ट्रॅक्टर समतल विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला.

ट्रॅक्टर विहिरीत पडून चालक ठार
बेलोरा : शेतात नांगरणी करणारा ट्रॅक्टर समतल विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. ही घटना पुसद तालुक्यातील कन्हेरवाडी येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
सुधाकर पांडुरंग बोडखे (३५) रा. कन्हेरवाडी असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सुधाकर आपले काका साहेबराव बोडखे यांच्या शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेला होता. नांगरणी सुरू होती. त्यावेळी शेतात असलेली समतल विहीर सुधाकरला दिसली नाही. काही कळायच्या आत ट्रॅक्टर २५ ते ३० फूट खोल विहिरीत कोसळला. यात ट्रॅक्टरखाली सुधाकर दबला. विहिरीत असलेल्या खडकाचा मार त्याला लागला असावा.
हा प्रकार लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. सुधाकरला तत्काळ बाहेर काढून पुसदच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुधाकरच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात साहेबराव बोडखे यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)