धावंडा नदीच्या काठावरच टाकली माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 21:56 IST2019-05-25T21:55:34+5:302019-05-25T21:56:43+5:30
धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

धावंडा नदीच्या काठावरच टाकली माती
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : धावंडा नदीच्या पुरामुळे दरवर्षी जवळपासच्या परिसराचे प्रचंड नुकसान होते. १२ वर्षापूर्वी धरण फुटल्यानंतर शहरात हाहाकार माजला होता. पुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, त्यावर उपाय म्हणून नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत पूर संरक्षण भिंतीकरिता ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून धावंडा नदीचे एक हजार ५६० मीटर आणि मोरणा नदीचे २६० मीटर रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मंजूर केले आहे.
अरुणावती पाटबंधारे विभागाअंतर्गत सदर बाब येते. या कामाची निविदा काढण्यात आली. अकलूज येथील राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा मंजूर झाली. त्यानंतर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू झाले. जूनपूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात निघालेली माती काठावर टाकून दबाई करण्याचा प्रस्ताव होता. मात्र नदीच्या वळणदार मार्गामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे काठावर टाकलेल्या मातीमुळे धोका अधिक वाढला. पुरामुळे ही माती वाहत जावून एक तर जवळपासच्या निवासी परिसरात पसरेल किंवा हीच माती वाहून धरणात जमा होण्याची शक्यता आहे.
तक्रारीनंतर माती उचलणार
माती काठावरच टाकली जात असल्याची बाब काही नागरिकांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना.राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून माती त्वरित उचलण्याचे निर्देश दिले. अरुणावती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अलाटकर यांना विचारले असता त्यांनी कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच माती उचलली जाईल, असे सांगितले. आता लवकरच राज्यमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली.
शहराच्या मध्यवस्तीतून वाहते नदी
शहराच्या अगदी मध्यातून धावंडा नदी वाहते. नदीच्या पश्चिम भागाला नांदगव्हाण धरण आहे. मात्र सध्या हे धरण उध्वस्त झाले आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी जोरदार प्रवाहाने नदीतून प्रवाहित होते. आता नदीचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू आहे. मात्र माती काठवरच टाकली जात असल्याने नवीन संकट निर्माण झाले आहे.