दुहेरी खुनाचा तपास एसडीपीओंकडे
By Admin | Updated: December 20, 2015 02:33 IST2015-12-20T02:33:33+5:302015-12-20T02:33:33+5:30
दुर्गा विसर्जनानंतर येथील मच्छीपूलस्थित रविदासनगर भागात झालेल्या दुहेरी खुनाचा तपास यवतमाळचे

दुहेरी खुनाचा तपास एसडीपीओंकडे
आरोपींचा शोध : रविदासनगरातील घटना
यवतमाळ : दुर्गा विसर्जनानंतर येथील मच्छीपूलस्थित रविदासनगर भागात झालेल्या दुहेरी खुनाचा तपास यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दुर्गोत्सवानंतर मच्छीपूल येथे २५ आॅक्टोबर शनिवार रोजी रात्री ९.३० वाजता शेख इरफान शेख रमजान उर्फ बबलू आणि दुसऱ्या गटातील मो. इकबाल मो. जब्बार व मो. जावेद उर्फ कालू मो. जब्बार या तिघांचा दोन गटांच्या भांडणात खून करण्यात आला होता. तीनही खुनाचे हे प्रकरण आतापर्यंत यवतमाळ शहर पोलीस ठाण्याकडे होते. परंतु यातील मो. इकबाल व मो. जावेद या दुहेरी खुनाचा तपास शहर पोलिसांकडून काढून घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बबलूच्या खुनाचा तपास शहर पोलीसच करीत आहे. दुहेरी खूनप्रकरणात आठ आरोपी आहेत. यातील शेख रिजवान व शेख इमरान यांना अटक झाली. इतरांचा शोध सुरू आहे. याच दुहेरी खुनात राय परिवारातील तीन सदस्यांची नावेही आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तपास येताच आरोपींच्या शोध मोहिमेचा वेग वाढला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ नुकतेच नागपूरलाही जावून आले.
या प्रकरणात अद्याप कुणालाही अटकपूर्व जामीन मिळाला नसल्याचे व प्रकरणात उपलब्ध पुरावे पाहता जामिनाची शक्यता नसल्याचे एसडीपीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. मच्छीपूल परिसरातील रविदासनगरातील तीन जणांच्या या खुनाच्या दोन घटनांमध्ये २२ आरोपी आहेत. या हल्ल्यात दोन जण जखमीही झाले होते. आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)