दाल मिलमध्ये डोम कोसळला; तीन कामगारांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:03 IST2025-04-16T15:02:45+5:302025-04-16T15:03:13+5:30

Yavatmal : लोहारा एमआयडीसीतील घटना; १०० क्विंटल डाळीने भरला होता डोम

Dome collapses in dal mill; three workers die on the spot | दाल मिलमध्ये डोम कोसळला; तीन कामगारांचा जागीच मृत्यू

Dome collapses in dal mill; three workers die on the spot

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
शहरातील लोहारा एमआयडीसीत दाल मिलमध्ये डोम कोसळल्याने तीन कामगारांचा दबून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी येथील मनोरमा इंडस्ट्रीजमध्ये घडली. १०० क्विंटल डाळीने भरलेला डोम अचानक कोसळला. त्यावेळी चार कामगार व एक सुपरवायझर खाली बसून काम करत होते.


सुनील जैन यांच्या मालकीची ही दाल मिल आहे. त्यांनी लोहारा एमआयडीसी परिसरातील नव्या भागात नुकताच वर्षभरापूर्वी हा प्लांट सुरू केला होता. येथे तुरीची डाळ तयार करून त्याचे पॅकिंग केले जाते. यासाठी सुपरवायझरसह पाच कामगार येथे कार्यरत आहे. मंगळवारी सायंकाळी फिल्टर झालेल्या डाळीचे पॅकिंग सुरू असतानाच अचानक डाळ साठविलेला डोम कोसळला.


यात मुकेश शंकरलाल काजळे (३०), सूरज सुंदरलाल काजळे (२०, दोघेही रा. रायपूर, मध्य प्रदेश) व भावेश विजय कडवे (२४, रा. वर्धा) या तिघांचा दबून जागीच मृत्यू झाला, तर करणसिंग धुर्वे (१९), दिलीप मरको (२७, दोघेही रा. रायपूर मध्य प्रदेश) हे जखमी झाले. घटना घडल्यानंतर कामगारांनी आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील इतर प्लांटमधील कामगार धावून आले. परंतु, शंभर क्विंटल डाळीने भरलेला डोम हलविणे शक्य नव्हते.


डाळ काढण्यास सुरुवात केली. काही वेळात तेथे क्रेन आणण्यात आली. क्रेनच्या मदतीने डोम जागेवरच उचलून त्याच्या खालून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. इतर दोघांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तातडीने दाल मिल सील करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून घटना कशी घडली याचा शोध पोलिस घेत आहेत.


मृताच्या नातेवाइकांचा आक्रोश
दाल मिलमध्ये घडलेल्या अपघाताची माहिती मिळताच भावेश कडवे याचे आई-वडील शासकीय रुग्णालय परिसरात पोहोचले. तेथे त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शोक अनावर झाला. मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश केला. त्यांचा टाहो पाहून रुग्णालय परिसरही गहिवरला.

Web Title: Dome collapses in dal mill; three workers die on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.