जिल्ह्यात डॉक्टरांचा तुटवडा
By Admin | Updated: June 8, 2017 00:28 IST2017-06-08T00:28:45+5:302017-06-08T00:28:45+5:30
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यात डॉक्टरांचा तुटवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरच नसल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन स्तरावरून पदे भरण्यास विलंब होत असल्याने शासनानेच ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणारे १२६ उपकेंद्र आहेत. याशिवाय काही ठिकाणी आयुर्वेद दवाखाने आहेत. या सर्वांसाठी गट ‘ब’ची १२५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी १०१ पदे भरण्यात आली असून २४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. यापूर्वी १६ पदे रिक्त होती. ती आता वाढून २४ वर गेली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांत एका वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्यात आले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
जिल्ह्यातील ६३ पैकी काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नाहीत. अपुऱ्या डॉक्टरांअभावी तेथे कुणाचीही नियुक्ती केली गेली नाही. अनेक तालुक्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. तेथील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तालुका आरोग्य अधिकारी पदाचा प्रभार देऊन गाडा हाकला जात आहे. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले आहेत. शासनाने ग्रामीण जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात तीन सहायक अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सहाय्यक करणारेच अधिकारी नाही. त्यामुळे पावसाळ्यात जिल्ह्यात साथरोगांची लागण झाल्यास आरोग्य विभागाला ती नियंत्रणात आणणे कठीण होणार आहे.