इतर जातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:20 IST2019-02-05T22:19:34+5:302019-02-05T22:20:31+5:30
गोवारी, धनगर, गोरबंजारा आणि इतर जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मताच्या राजकारणासाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळे आरक्षणाची मागणी करीत असलेल्या इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये,.....

इतर जातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गोवारी, धनगर, गोरबंजारा आणि इतर जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मताच्या राजकारणासाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळे आरक्षणाची मागणी करीत असलेल्या इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, या मागणीसाठी आदिवासी आरक्षण संरक्षण कृती समितीने धरणे दिले.
स्थानिक तिरंगा चौकात आदिवासी आरक्षण संरक्षण कृती समितीने एक दिवसीय धरणे दिले. यावेळी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यपालांकडे निवेदन पाठविण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचे खोटे दाखले सादर करून गैरआदिवासींनी आरक्षित लाखो नोकऱ्या बळकावल्या. त्या कार्यरत बोगसांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्या ठिकाणी नव्याने पात्र आदिवासीची नेमणूक करावी. वणी विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव करावा. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावातील आदिवासींवर दाखल करण्यात आलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावे. तेथील आदिवासी बांधवांना संरक्षण देण्यात यावे. यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी आरक्षण संरक्षण कृती समितीचे बंडू सोयाम, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गुलाब कुडमेथे, परधान समाज संघटनेचे अध्यक्ष बबनराव सोयाम, बिरसापर्वाचे अध्यक्ष राजू चांदेकर, अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर, बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, किशोर कनाके, महादेव सिडाम, मधू सिडाम, लक्ष्मण येरमे आदी उपस्थित होते.