शेतकऱ्यांना त्रास देऊ नका
By Admin | Updated: December 29, 2014 02:14 IST2014-12-29T02:14:47+5:302014-12-29T02:14:47+5:30
शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करा. शासनाच्या त्यांच्यासाठी असलेल्या योजना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

शेतकऱ्यांना त्रास देऊ नका
आर्णी : शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करा. शासनाच्या त्यांच्यासाठी असलेल्या योजना वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना त्रास होईल असे वर्तन शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होऊ नये, असे आमदार प्रा.राजू तोडसाम म्हणाले.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू तोडसाम यांनी प्रथमच आर्णी तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतला. परंतु या बैठकीला अरुणावती प्रकल्प, वन विभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालय अशा महत्त्वाच्या कार्यालयातील कुणीही उपस्थित नव्हते. बहुसंख्य अधिकाऱ्यांनी या बैठकीला पाठ दाखविल्यामुळे आमदार चांगलेच संतापले. त्यांनी गैरहजर असणाऱ्यांवर कारवाईचे पत्र काढण्याचे निर्देश हेमंत गांगुर्डे यांना दिले.
आढावा बैठकीला कार्यालय प्रमुखांनी उपस्थित न राहता आपला प्रतिनिधी पाठविण्यावर जोर दिला. या प्रतिनिधींना संबंधित प्रश्नांची माहितीच नसल्याचेही उघडकीस झाले. काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित ग्रामस्थांनी तो वेळीच हाणून पाडला. पंचायत समितीच्या कृषी विभागातून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कशा प्रकारे पैसे मागितले जातात, याची अनेक उदाहरणे शेतकऱ्यांनी आमदाराला सांगितली. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले.
तालुका कृषी कार्यालयाचा कशा प्रकारे भोंगळ कारभार सुरू आहे, हे स्वत: आमदारांनीच उघडकीस आणला. कोणतीही सिंचनाची कामे करताना योग्य जागा अंतिम झाल्याशिवाय अंदाजपत्रक बनवू नये, असे निर्देश यावेळी आमदारांनी दिले. कृषी विभागाकडून इंजन व विहिरींचे चेक देताना शेतकऱ्यांना कशा प्रकारे पैसे मागितले जातात आणि पैसे दिल्यावर काम कसे जलद गतीने होते, हेसुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य विभागातील उपकेंद्रांवर कर्मचारीच राहात नाही. अधिकारी, कर्मचारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. शिक्षण विभागात पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळांमधील संगणक सुरूच नाही. अनेक शाळांमध्ये वीज पुरवठा नाही. अंगणवाडीमध्ये मुलांसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आर्णी नगरपरिषद झाल्यामुळे या भागात येणाऱ्या अंगणवाड्या नगरपरिषदांमध्ये येणे आवश्यक होत्या. परंतु तीन वर्ष होऊनही ते झाले नाही. यामुळे या अंगणवाड्यांची दयनीय अवस्था आहे. काही अंगणवाड्यांना छप्परसुद्धा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत असल्याचा संतापजनक प्रकार या बैठकीत समोर आला. अधिकाऱ्यांनीसुद्धा या बाबीला दुजोरा दिला. परंतु नगरपरिषदेचे मुख्याधिकारीच बैठकीला उपस्थित नसल्यामुळे याबाबत कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही.
आर्णी ते सावळी हा रस्ता अद्यापही रखडल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला असता संबंधित कंत्राटदाराला या प्रकरणी दंडसुद्धा आकारण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या सोयीच्या पांदण रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशा सूचना आमदारांनी दिल्या. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यासाठी पंचायत समितीने आतापासूनच योग्य नियोजन करायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. या बाबत विशेष बैठक घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे, तसेच त्यांना वीज जोडणीही त्वरित मिळावी, अशा सूचना संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. विहिरीच्या देयकासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये केवळ येरझारा माराव्या लागतात, काही ठिकाणी पैसे द्यावे लागतात. मनरेगात एकाच मस्टरच्या नावावर दोन कामातून पैसे उकळण्यात येतात. पंचायत समितीमधून एक मस्टर दोन कामावर कसे पोहोचते आदी तक्रारीसुद्धा यावेळी करण्यात आल्या.
बैठकीला परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक व शेतकऱ्यांचीही उपस्थिती होती.
(शहर प्रतिनिधी)