जिल्हाध्यक्ष ‘वेटिंग’वर
By Admin | Updated: April 15, 2016 02:03 IST2016-04-15T02:03:14+5:302016-04-15T02:03:14+5:30
राज्यातील रखडलेल्या जिल्ह्यांचे अध्यक्षपद जाहीर झाले असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नशिबी अध्यक्षपदासाठी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे.

जिल्हाध्यक्ष ‘वेटिंग’वर
काँग्रेसमधील गटबाजी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर नजर
यवतमाळ : राज्यातील रखडलेल्या जिल्ह्यांचे अध्यक्षपद जाहीर झाले असले तरी यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नशिबी अध्यक्षपदासाठी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. सोनिया गांधी व राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही जिल्हाध्यक्षपदाबाबत तोडगा न निघाल्याने जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी किती टोकाला गेली असावी, याचा अंदाज येतो.
राज्यात १६ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी रखडलेले जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परंतु नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. यवतमाळ जिल्हा काँग्रेसमधील भांडणे दूरवर पोहोचली आहे. येथे शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, वसंतराव पुरके या नेत्यांचे प्रमुख गट मानले जातात. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी वारंवार सांगूनही कुण्या एका नावावर जिल्हाध्यक्ष पदाबाबत शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. हा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. नवा जिल्हाध्यक्ष द्यायचा की विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यांच्याच हाती कमांड कायम ठेवायची यावर मंथन सुरू आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील दिग्रसचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही जिल्हाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली आहे. मात्र त्यांचा पक्षाला नेमका फायदा काय आणि तोटा काय यावरही चिंतन होत आहे.
काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्यासह अनेक जण इच्छुक असले तरी आर्थिकदृष्ट्या भक्कम असलेल्या नेत्यालाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा काँग्रेसचा नवा अध्यक्ष घोषित होण्यास आणखी किती वेळ लागणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण अनेकांना जिल्एयाच्या नव्या टीमचे वेध लागलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
राज्य कार्यकारिणीत फेरबदल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये जिल्ह्यात फेरबदल पहायला मिळाला. आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांना थांबवून उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांना महासचिव म्हणून स्थान देण्यात आले. ‘हिंगोली कनेक्शन’मधून खडसे यांची वर्णी लागल्याचे सांगितले जाते. पुसदमधून वजाहत मिर्झा व मोहंमद नदीम हे जुनेच चेहरे कायम आहेत. पुसदमधून नव्या नेतृत्वाचा उदय केव्हा होणार असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. मोघे, पुरके यांना राज्य कार्यकारिणीत सदस्यपदी स्थान दिले गेले. या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील पुरकेंची गती काहीशी कमी केली गेल्याचे मानले जाते. राज्य कार्यकारिणीमध्ये बंजारा, मुस्लीम, दलित, आदिवासी या सर्वच समाजाचे चेहरे दिसत असले तरी जिल्ह्यातून कुणबी समाजाला स्थान दिले गेलेले नाही. संजय देशमुखांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावून कुणबी समाजाला खूश केले जाऊ शकते. मात्र देशमुखांना हा समाज किती ‘आपला’ मानतो हे पाहणेही महत्वाचे ठरते.
... तर श्रेय कुणाला ?
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नेतृत्व दिल्यास नेमकी कुण्या गटाची सरशी होणार, याबाबतही संभ्रम आहे. कारण शिवाजीराव मोघे यांनीच देशमुख यांना मुंबई-दिल्लीत नेऊन श्रेष्ठींच्या भेटी घालून दिल्या होत्या. याच मुद्यावर प्रजासत्ताक दिनी काँग्रेस कमिटी कार्यालयात मोघे-कासावार यांच्यात वादही रंगला होता. कासावारांकडेच जिल्ह्याची धूरा कायम ठेवावी या दृष्टीने माणिकराव ठाकरे गटाचे सुरूवातीचे प्रयत्न होते. परंतु आता ठाकरेंना यवतमाळ-वाशिम लोकसभेचे वेध लागले आहेत. या दिल्लीच्या मार्गात येणाऱ्या दिग्रस, राळेगाव विधानसभा मतदारसंघाची नाराजी नको म्हणून ठाकरे यांनीही कुणाच्या नावाला विरोध न करता देशमुखांच्या नावाबाबत आता ‘सॉफ्टकॉर्नर’ ठेवल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी देशमुखांचे सूत गिरणीतील योगदानही महत्वपूर्ण ठरले आहे.