जिल्ह्यातील रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर
By Admin | Updated: October 26, 2014 22:46 IST2014-10-26T22:46:04+5:302014-10-26T22:46:04+5:30
तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून

जिल्ह्यातील रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर
३० सप्टेंबरला मुदत संपली : परवानगीसाठी लिलाव खोळंबले
यवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून दररोज शेकडो ब्रास रेती शहरात पोहोचत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने लिलावाला मंजुरी दिली असली तरी पर्यावरण विभागाने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात २९५ रेती घाट आहेत. नदी, नाल्यावर असलेल्या या रेती घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र अद्यापही या रेती घाटांचा लिलाव झाला नाही. विशेष म्हणजे खनिकर्म विभागाने २०१३ मध्ये लिलाव केलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे कंत्राटदारांंचा घाटावरील ताबा संपुष्टात आला आहे. ही मुदत संपण्यापूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाकडून रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात रेती घाटाची लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे.
अधिक माहिती घेतली असता रेती घाट असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी लिलावासाठी परवानगी दिली आहे. असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले. त्यातील ९५ रेती घाटांचे लिलाव करण्याची मंजुरी भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. मात्र पर्यावरण विभागाने अद्याप एकाही रेती घाटाला परवानगी दिली नाही.
त्यामुळे लिलाव खोळंबला आहे. गतवर्षी रेती घाटांच्या लिलावातून प्रशासनाला १७ कोटींचा महसूल मिळाला होता. यावर्षी आलेल्या निवडणुका आणि दिवाळीमुळे रेती घाटांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा स्थितीत रेती माफियांनी घाटांवरून रेती चोरण्याचा सपाटा लावला आहे. रात्रीच्या वेळी ट्रक-ट्रॅक्टरद्वारे रेती चोरुन शहरात आणल्या जाते. शहराबाहेर रेतीचे मोठे ढिगारे तयार झाले आहे.
पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर रेतीचे अनेक घाट आहेत. या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. परंतु या घाटांची मुदत संपली असून नवीन लिलाव प्रक्रिया झाली नाही. तरीही या घाटांवर अनेक वाहने रेती चोरताना दिसून येतात. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या काळात महसूल प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे दुर्लक्ष झाले. त्यानंतर दिवाळी आली. सुट्यांमुळे कुणीही घाटांवर लक्ष दिले नाही. याचा फायदा रेती माफियांनी घेत रेती चोरीचा सपाटा लावला आहे. (शहर वार्ताहर)