जिल्ह्याला मागणीच्या ५० टक्केच ‘रेमडेसीवीर’चा होतोय पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 05:00 IST2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:07+5:30
गंभीर रुग्णांचा उपचार करायचा कसा, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे. रुग्णाच्या शरीरातील कोरोना संसर्गाचा स्कोअर पाहून रेमडेसीवीर इंजेक्शन दिले जाते. ज्या रुग्णांचा स्कोअर ८ च्या पुढे आहे, अशा रुग्णांवर रेमडेसीवीरचा उपचार केला जातो. एका रुग्णाला सहा रेमडेसीवीरचे इंजेक्शन पाच दिवसांत द्यावे लागते. पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन दिली जातात. जिल्ह्यात कोरोनाची भयंकर लाट आली असून, १७ कोविड हॉस्पिटलमध्ये ५२१ बेडची मान्यता आहे.

जिल्ह्याला मागणीच्या ५० टक्केच ‘रेमडेसीवीर’चा होतोय पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा कहर अचानक वाढला आहे. शासकीय कोविड सेंटरसोबतच खासगी कोविड रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. यासोबतच कोरोनात प्रभावी ठरणारे औषध म्हणून रेमडेसीवीरचा वापर केला जातो. जिल्ह्यातील १७ कोविड सेंटरमध्ये ४०० च्यावर रुग्ण दाखल आहेत. दिवसाला ५०० ते ६०० रेमडेसीवीर इंजेक्शन लागतात. प्रत्यक्षात त्यापेक्षा अर्धाच साठा उपलब्ध होत आहे. दोन दिवसांत ४८० इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. यामुळे गंभीर रुग्णांचा उपचार करायचा कसा, असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे.
रुग्णाच्या शरीरातील कोरोना संसर्गाचा स्कोअर पाहून रेमडेसीवीर इंजेक्शन दिले जाते. ज्या रुग्णांचा स्कोअर ८ च्या पुढे आहे, अशा रुग्णांवर रेमडेसीवीरचा उपचार केला जातो. एका रुग्णाला सहा रेमडेसीवीरचे इंजेक्शन पाच दिवसांत द्यावे लागते. पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन दिली जातात. जिल्ह्यात कोरोनाची भयंकर लाट आली असून, १७ कोविड हॉस्पिटलमध्ये ५२१ बेडची मान्यता आहे. रुग्ण वाढत असल्याने खासगी कोविडमध्ये त्यापेक्षा अधिक बेड टाकून रुग्ण उपचार घेत आहेत. रेकॉर्डप्रमाणे ३६९, तर प्रत्यक्षात ४४० च्यावर गंभीर रुग्ण खासगी कोविडमध्ये उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांना रेमडेसीवीर हे इंजेक्शन आवश्यक आहे. मात्र, अनेक कारणांनी यवतमाळात रेमडेसीवीरचा पुरवठा थांबला आहे.
यवतमाळमध्ये रेमडेसीवीर पुरवठा करणाऱ्या पाच कंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत. त्यानंतरही हा तुटवडा भासत आहे. नागपूर शहरात सिप्ला, हेट्रो यांसह इतर कंपन्यांचे डेपो आहेत. तेथून इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. आता गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने कंपन्यांचे उत्पादन कमी पडत आहे. मध्यंतरीच्या काळात काही कंपन्यांचा स्टॉक हा एक्सपायरी डेटपर्यंत आला होता. त्यामुळे त्यांनी उत्पादनाची गती कमी केली. आता मागणी वाढली, पण उत्पादन कमी अशी स्थिती आहे. याशिवाय हे इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेरून येतो. त्याचाही पुरवठा अनियमित असल्याचे सांगितले जाते. रेमडेसीवीरला पर्याय म्हणून सेप्सिमॅक हे औषध आहे. मात्र, याला अजूनही क्लिनिकल ट्रायलची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे डॉक्टर वापरण्यास तयार नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास रेमडेसीवीर आणायचे कोठून व गंभीर रुग्णांवर उपचार करायचा कसा, हा प्रश्न खासगी डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे.
महागड्या ‘ॲक्ट्रेमरा’ची मागणी चौपटीने वाढली
n अतिशय गंभीर रुग्णांना जीव वाचविण्यासाठी म्हणून ॲक्ट्रेमरा हे ४० हजार रुपये किमतीचे इंजेक्शन दिले जाते. पूर्वी या इंजेक्शनच्या जिल्ह्यात महिन्याकाठी दहा ते पंधरा व्हायल विकल्या जायच्या. आता महिन्याला ५० ते ६० व्हायलची विक्री होत आहे. मागणी वाढल्याने या इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून कोरोनाची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
रेमडेसीवीर तयार करणाऱ्या सातपैकी पाच कंपन्यांकडे ॲडव्हॉन्स पेमेंट जमा आहे. ५० ते ६० लाख रुपये यात गुंतले आहे. व्याजाचे सोडा, औषधाचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. स्टॉकिस्ट असूनही तुटवडा भासतोय. यावरून इतर ठिकाणची काय अवस्था असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. या औषधासाठी दिवसाला ३०० ते ४०० कॉल येतात. पण, प्रत्येकाचे समाधान शक्य होत नाही.
- सुरेश राठी, स्टॉकिस्ट, यवतमाळ.
नागपुरात औषध कंपन्यांचा डेपो आहे. तेथून बहुतांश साठा नागपूरमध्ये दिला जातो. शुक्रवारी रात्री स्वत: जाऊन रेमडेसीवीर इंजेक्शन आणले. आणखी प्रयत्न करून अधिक व्हायल मिळविणे आवश्यक आहे. एक दिवस पुरेल इतकेही व्हायल जिल्ह्यात उपलब्ध नाही.
- पंकज नानवाणी,
अध्यक्ष, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळ.