जिल्हा सहकारी बॅंकेची रोकड चक्क अवैध सावकारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:08+5:30

बॅंकेतील रोकड मोजली असता त्यात ३० लाख रुपये कमी आढळल्याची चर्चा बॅंक वर्तुळात आहे.  या चर्चेनुसार, बॅंकेची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी संबंधितांना संधी दिली गेली. त्यांनी लगेच ३० लाख रुपयांची ही कॅश बॅंकेत आणून भरली. ३० लाखांची ही रोकड चक्क पोत्यात भरुन आणण्याचा हा प्रकार   बॅंकेतीलच सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर आर्णी शाखेतील रोखपालाची तातडीने महागावला बदली केली गेली.  रोखपालाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशीही केली जाणार आहे.

District Co-operative Bank's cash in illegal lending | जिल्हा सहकारी बॅंकेची रोकड चक्क अवैध सावकारीत

जिल्हा सहकारी बॅंकेची रोकड चक्क अवैध सावकारीत

ठळक मुद्दे३० लाखांची कॅश क्षणात जमा केल्याची चर्चा : पोत्यात आणलेली रक्कम ‘सीसीटीव्ही’त कैद, कॅशिअरची तडकाफडकी बदली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तिजोरीतील रोख रक्कम चक्क अवैध सावकारीत वापरली जात असल्याचा खळबळजनक प्रकार आर्णी शाखेत उघडकीस आला. एका निनावी फोनने याचे बिंग फोडल्यानंतर बॅंकेच्या यवतमाळ मुख्यालयातून वेगाने चौकशी केली गेली. प्राथमिक चौकशीत अंशत: तथ्य आढळल्याने तेथील रोखपालाची तडकाफडकी महागावात बदली करण्यात आली. आणखी दोघे निशाण्यावर आहेत.
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेत गेल्या काही दिवसांपासून आर्थिक गौडबंगाल सुरू आहे. बॅंकेतील कॅश बाहेर अवैध सावकारीत दोन टक्के व्याज दराने दिली जात असल्याचे सांगितले जाते. अनेक महिन्यांपासून बॅंकेचा पैसा कागदावर तिजोरीत दाखवून प्रत्यक्षात बाहेर सावकारीत वापरला जात आहे. २६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात व्यक्तीने बॅंकेच्या यवतमाळ मुख्यालयात फोन केला आणि आर्णी शाखेत सध्या ३० लाख रुपये कॅशमध्ये कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या मुख्यालय प्रशासनाने सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना तातडीने आर्णीला रवाना केले. त्यांनी अचानक  जावून बॅंकेतील रोकड मोजली असता त्यात ३० लाख रुपये कमी आढळल्याची चर्चा बॅंक वर्तुळात आहे.  या चर्चेनुसार, बॅंकेची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी संबंधितांना संधी दिली गेली. त्यांनी लगेच ३० लाख रुपयांची ही कॅश बॅंकेत आणून भरली. ३० लाखांची ही रोकड चक्क पोत्यात भरुन आणण्याचा हा प्रकार   बॅंकेतीलच सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर आर्णी शाखेतील रोखपालाची तातडीने महागावला बदली केली गेली.  रोखपालाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशीही केली जाणार आहे. या चौकशीअंति आणखी संबंधित दोघांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
गेल्या अनेक महिन्यांपासून बॅंकेच्या कॅशवर दोन टक्के व्याज दराने सावकारी करण्याचा हा गोरखधंदा सुरू आहे. बॅंकेतीलच एक कर्मचारी या सर्वाचा ‘मास्टर माईंड’ आहे. आर्णीतीलच कृषी व्यापाऱ्याकडे ही कॅश दिली जात होती, असे बोलले जाते.
बॅंक प्रशासनाकडून सारवासारव 
या प्रकरणात बॅंक प्रशासनाकडून सारवासारव केली जात आहे. बॅंकेची इभ्रत वाचविणे हा त्यामागील हेतू आहे. बॅंकेच्या जबाबदार सूत्रांनी सांगितले की, जिल्हा बॅंकेच्या शाखांना त्यांच्या ठेवीच्या तुलनेत दहा लाखांपासून एक कोटीपर्यंत कॅश ठेवण्याची मर्यादा आहे. आर्णी शाखेला ही मर्यादा ७० लाख एवढी निर्धारित करून देण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून या शाखेत या मर्यादेपेक्षा २० ते २५ लाख अधिक कॅश ठेवली जात होती. त्यामुळे शंका निर्माण झाली. नियमानुसार त्यांनी ही कॅश मुख्यालयाला पाठविणे अथवा त्याबाबत कळविणे बंधनकारक आहे. मात्र तसे केले जात नसल्याने या शाखेवर वॉच होता. म्हणून अचानक तेथे तपासणी केली असता २८ हजारांची रोकड कमी भरली. संबंधिताने ती लगेच जमा केली. 
सूत्रानुसार, २८ हजारांची कमी भरलेली ती रोकड पोत्यामधील  ३० लाखांच्या रकमेतील असल्याचे सांगण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये बॅंकेत पोते आणल्याचे दिसते. मात्र त्यात कॅश आहे की नाही हे सखोल चौकशीअंति स्पष्ट होईल. सध्या तरी या पोत्यामध्ये व्हाउचर असल्याचे संबंधित कर्मचारी सांगत आहे. मुळात हे सीसीटीव्ही फुटेज मिळायला विलंब झाल्याची बाब बॅंकेने मान्य केली. 
 

कर्ज वसुली, निराधार रकमेतही घोळ 
जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेत कर्ज वसुलीची रक्कम आणि निराधार योजनेच्या अनुदान रकमेतही असाच घोळ असल्याची चर्चा आहे. वसुलीची रक्कम केवळ कागदावर दाखवून प्रत्यक्षात ती इतरत्र वापरली जात होती. तपासणीत कमी आढळलेली ३० लाखांची कॅश अवघ्या १५ मिनिटांत आणून भरली कशी, कुणाकडून आणली याबाबी चौकशीत उघड होण्याची अपेक्षा आहे. तातडीने केलेल्या ३० लाखांच्या व्यवस्थेतच अवैध सावकारीचे मूळ दडून असल्याचे बोलले जाते. 

अध्यक्षांच्या अकस्मात भेटी अन्‌ कॅशची तपासणी 
आर्णीतील प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी बॅंक शाखांना अचानक भेटी देऊन  सर्वप्रथम तेथील कॅश मोजण्याचा सपाटा सुरू केला आहे. अलीकडेच त्यांनी मारेगावात सकाळी १०.१५ वाजता बॅंक उघडल्याबरोबर तर शिंदोला येथे सायंकाळी ५.३० वाजता बॅंक बंद होताना भेट देऊन तेथील कॅशची तपासणी केली. याशिवाय बॅंकेतील अधिकाऱ्यांनी बाजोरियानगर व कॉटन मार्केट येथील बॅंक शाखांना भेटी देऊन कॅशची तपासणी केली. 
 

Web Title: District Co-operative Bank's cash in illegal lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.