एटीएम, सेवा करातून जिल्हा बँकेची कोट्यवधीची कमाई
By Admin | Updated: April 10, 2015 00:16 IST2015-04-10T00:16:29+5:302015-04-10T00:16:29+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या जिल्हाभरातील सर्व ग्राहकांकडून सेवा करापोटी प्रत्येकी ५७ रूपये व एटीएम सेवा करापोटी १६९ रूपये वसूल करून कोट्यवधी रूपयांची कमाई केली.

एटीएम, सेवा करातून जिल्हा बँकेची कोट्यवधीची कमाई
वणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या जिल्हाभरातील सर्व ग्राहकांकडून सेवा करापोटी प्रत्येकी ५७ रूपये व एटीएम सेवा करापोटी १६९ रूपये वसूल करून कोट्यवधी रूपयांची कमाई केली. इतर बँकांमध्ये अशा प्रकारचा कोणताही कर घेतला जात नाही. जिल्हा बँकेलाच असा कर लावण्याची गरज का पडली, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसाधारण ग्राहकांची बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हाभरात या बँकेच्या १८0 च्यावर शाखा आहेत. लाखो ग्राहक या बँकेशी जुळले आहे. शेतकरी व शिक्षक हे तर या बँकेचे आधारस्तंभच मानले जातात. मात्र जिल्हा बँकेने मागील दोन वर्षांपासून ग्राहकांकडून सेवा कर वसूल करणे सुरू केले आहे. वास्तविकत: ग्राहकांच्या बचत खात्यात बरीच रक्कम शिल्लक असते. बँक त्यावर केवळ तीन ते चार टक्के व्याज देते.
आता नुकतीच बँकेने आवश्यक ठेव रकमेतही वाढ केली आहे. चेकबुक असणाऱ्या ग्राहकांना तर कमीतकमी दोन हजार रूपये बचत खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक केले आहे. ही रक्कम बँकेला कर्ज दराने वाटता येते. त्यावर १०-१२ टक्के व्याज मिळवून बँक नफाही कमावू शकते. तरीही बँकेने सेवाकराच्या नावावर ग्राहकांकडून वसुली करण्याचे धोरण अवलंबले आहे. खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार खाते याच बँकेत आहे. पगार करण्यासाठी शिक्षण विभाग बँकेला कमिशनही देते. तसा बँक व शिक्षण विभागात करार झालेला आहे. तरीही पगार खात्यावरही बँक सेवाकर लावून अधिकचा नफा कमावण्याचा प्रयत्न करीत आहे.
या बँकेचे जिल्हाभरात लाखो ग्राहक आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी ५७ रूपये सेवाकर बँकेने नुकताच ग्राहकांच्या बचत खात्यातून परस्पर कपात केला. त्यापोटी कोट्यवधी रूपये बँकेने जमा केले. तसेच जिल्हा बँकेने या बँकेच्या माध्यमातून एटीएम सेवा सुरू केली. परंतु कोठेही मशीन लावलेली नाही. तरीही एटीएम सेवेपोटी प्रत्येक एटीएम कार्डधारकाकडून प्रत्येकी १६९ रूपये खात्यातून कपात करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे स्वत:चे एटीएम नसल्याने दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा ग्राहकांना वापर करावा लागतो. दुसऱ्या एटीएममधून तीनपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास त्याचाही ‘चार्ज’ ग्राहकांना भरावा लागतो. तरीही जिल्हा बँकेने प्रत्येकी १६९ रूपयांची वसुली करून ग्राहकांना धक्काच दिला आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये असा कोणताही सेवाकर किंवा एटीएम सेवाकर लावला जात नाही. राष्ट्रीयीकृत बँका जर ग्राहकांना मोफत सेवा देऊ शकतात, तर जिल्हा बँकेला मोफत सेवा देणे का परवडत नाही?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेने एनईएफटी व आरटीजीएस सेवाही सुरू केली आहे.
मात्र या सेवेचे नियमही इतर बँकांपेक्षा वेगळे असल्याने ग्राहक या सेवेचा फारसा लाभ घेताना दिसत नाही. तरीही बँंक ग्राहकांना सुविधा देण्यास तयार नाही. तथापि सुविधा न देताही कर मात्र वसूल केला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)