सोशल मीडियावरून देहविक्रीचे नेटवर्क
By Admin | Updated: February 11, 2016 02:45 IST2016-02-11T02:45:26+5:302016-02-11T02:45:26+5:30
काही वर्षापूर्वी शहराच्या विशिष्ट वस्तीत असलेला देहविक्रीचा व्यापार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील पॉश वस्तीपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

सोशल मीडियावरून देहविक्रीचे नेटवर्क
आंबटशौकिनांची चंगळ : यवतमाळात ग्रुप सक्रिय, फोटो आणि व्हिडिओही अपलोड करण्याची ‘सोय’
सुरेंद्र राऊत यवतमाळ
काही वर्षापूर्वी शहराच्या विशिष्ट वस्तीत असलेला देहविक्रीचा व्यापार आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील पॉश वस्तीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना आकर्षित केले जात असून यात थेट फोटो आणि व्हीडीओ अपलोड करण्याची ‘सोय’ केली जाते. यवतमाळात सोशल मीडियावर असे काही ग्रुप कार्यरत असून या माध्यमातून आंबटशौकिनांना ‘सेवा’ पुरविली जाते.
यवतमाळ शहरात रेडलाईट एरिया नसला तरी हा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी साखळी मात्र कार्यरत आहे. काही वर्षापूर्वी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीतून ग्राहक मिळविले जायचे. आर्थिक देवाणघेवाणही होत होती. परंतु यात मोठा धोका असायचा. मात्र आता या व्यवसायातही सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यवतमाळ शहरात देहविक्रीशी संबंधित सोशल मीडियावर ग्रुप कार्यरत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक आंबटशौकिनांना एकत्र आणले आहे. ग्रुपमध्येही ग्रेडींग केले असून त्यानुसारच दर ठरविले जातात. आर्थिक क्षमता पाहून सुविधा पुरविली जाते. आंबटशौकिनांपर्यंत थेट फोटो आणि व्हीडीओ पाठविण्याचीही यात सुविधा असल्याची माहिती आहे. यावरून ग्राहकाने पसंती दर्शविल्यानंतर सुरू होते आर्थिक बोलणी. दोन हजार रुपयांपासून दहा हजारापर्यंत यासाठी दर ठरविले जातात. तसेच नंतरच्या व्यवस्थेसाठी वेगळे दर आकारले जातात. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा ग्रुप कार्यरत असून याची कुठेही वाच्छता केली जात नाही. या ग्रुपच्या सदस्यांनाच याची माहिती असते.
या ग्रुपवर आठवड्यातून दोन-तीन वेळा मुलींचे, महिलांचे फोटो अपलोड केले जातात. पसंती ठरवून देवाणघेवाणीचे व्यवहार होतात. ही पद्धत अनेकांना सुरक्षित वाटत असल्याने अनेक जण यात सहभागी होत आहे. ग्राहकांच्या सोईसाठी निर्जनस्थळी भेटीगाठीही घडवून दिल्या जातात. शहरातील काही भागातील फ्लॅट या व्यवसायासाठी क्रुप्रसिद्ध आहे. या भागातील रहिवाशांनी अनेकदा विरोधही करून पाहिला. परंतु कुणी जुमानत नाही. तर अनेक आंबटशौकीन शहराबाहेरील निर्जनस्थळे शोधत असतात. विशेष म्हणजे तरुणांसोबत प्रौढांमध्येसुद्धा या आॅनलाईन देहविक्रीची जोरदार चर्चा आहे. पोलिसांना याची माहिती असली तरी आजपर्यंत कुणीही थेट कारवाईचे धाडस मात्र केले नाही.
राज्याबाहेरील मुलींचा शिरकाव
यवतमाळ शहरातीलच नव्हे तर राज्याबाहेरील मुलीही या ग्रुपमध्ये असल्याची माहिती आहे. आंबटशौकिनांसाठी त्यांची सेवा दलालांच्या माध्यमातून पुरविली जाते. गोदनी मार्गावर बालीने टाकलेल्या डेऱ्याची शहरात सर्वाधिक क्रेझ आहे. अनेक तरुणी या ग्रुपमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे.
अशी होते ओळख परेड
सोशल मीडियावरुन संबंधितांपर्यंत फोटो पाठविल्यानंतर मध्यस्थ बोलणी करतो. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणीच ओळख परेड करून दिली जाते. अनेकदा प्रेमीयुगुल बोलत असेल असे समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र याच ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होते. या प्रकाराची माहिती पोलीस खात्यातील जाणत्यांना आहे. परंतु अर्थपूर्ण व्यवहारातून ही मंडई अद्यापपर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवरच आली नाही.
अन् मुलगी सुखरुप आई-वडिलांकडे
रागाच्या भरात घराबाहेर पडलेली एक मुलगी अशाच व्यवसाय करणाऱ्या एका महिलेच्या तावडीत सापडली होती. यवतमाळच्या बसस्थानकावरून तिला ताब्यात घेऊन तीन दिवस स्वत:च्या ताब्यात ठेवले. तिची विक्री करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र त्यावेळी शहर ठाण्यातील दक्ष अधिकाऱ्यामुळे हे बिंग फुटले आणि ती मुलगी आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचली. मात्र त्यानंतर या रॅकेटचा तपास पुढे सरकलाच नाही. संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रकरण तेथेच गुंडाळल्या गेले.
नागपूर कनेक्शन उघड
देहविक्रीच्या व्यवसायाचे नागपूर कनेक्शन उघड झाले होते. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी यवतमाळातील एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे एक महाविद्यालयीन तरुणीसुद्धा सापडली होती. परंतु पुढे काय झाले हे मात्र कळायला मार्ग नाही.