भाजपातील तरुणावर संचालकांचे एकमत
By Admin | Updated: June 8, 2017 00:28 IST2017-06-08T00:28:06+5:302017-06-08T00:28:06+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या प्रभारी अध्यक्षपदासाठी भाजपाच्या पठडीतील तरुण संचालकाच्या नावावर

भाजपातील तरुणावर संचालकांचे एकमत
जिल्हा मध्यवर्ती बँक : प्रभारी अध्यक्ष निवड, सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या प्रभारी अध्यक्षपदासाठी भाजपाच्या पठडीतील तरुण संचालकाच्या नावावर बँकेतील बहुतांश संचालकांचे एकमत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील प्रमुख सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त बैठक होत असून त्यात या तरुण नेत्याच्या नावावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली. बँकेशी संबंधित नियमित पीककर्ज वाटप, थकबाकीदार, वसुली व अन्य काही मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय बँकेचे नवे प्रभारी अध्यक्ष कोण? यावरही संचालकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. चर्चेतील उमेदवारांची नावे, त्यांचे कौशल्य, मेरीट यावरही खल झाला. अखेर सरकारचा पाठिंबा मिळविणे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार देणे यावर चर्चेचा फोकस होता. गेल्या आठ-दहा वर्षात बँकेची बिघडलेली घडी निट बसविणे, बँकेच्या नफ्यात वाढ करणे, ४५ टक्क्यांच्या पुढे गेलेला बँकेचा एनपीए (बुडीत कर्ज) नियंत्रणात आणणे, चुकीच्या कर्जप्रकरणांना ब्रेक लावणे, बँकेची प्रगती साधणे आदी अपेक्षा संचालकांना नव्या प्रभारी अध्यक्षांकडून राहणार आहे. या सर्व अपेक्षापूर्तीसाठी भाजपातील एका तरुण संचालकाच्या नावावर चर्चा झाली आणि काही तासांच्या चर्चेनंतर त्यावर एकमतही झाले. आता गुरुवारी सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांची सायंकाळी बैठक होत आहे. त्यात संचालकांनी एकजुटीने पुढे केलेल्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे न झाल्यास संचालकांची नेत्यांविरुद्ध बंडाचीही तयारी असल्याची माहिती आहे.
नेत्यांच्या उमेदवाराला बँकेत तीन वेळा ‘धक्का’
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नेत्यांनी सुचविलेला उमेदवार पाडण्याचे कसब संचालकांनी यापूर्वी तीन वेळा दाखविले होते. ते पाहता यावेळी नेतेमंडळी संचालकांना अव्हेरून स्वत:चा वेगळा उमेदवार देण्याची चूक करणार नाही, असा सहकार क्षेत्रातील सूर आहे. ही चूक झाल्यास नेत्यांच्या उमेदवाराला बँकेत आता चौथ्यांदा धक्का देण्याची तयारीही संचालकांनी केल्याची माहिती आहे.