दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

By Admin | Updated: October 20, 2014 23:20 IST2014-10-20T23:20:08+5:302014-10-20T23:20:08+5:30

केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली.

Dighar assembly dissolve in discontent | दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

दिग्रस विधानसभेत फुटला असंतोषाचा बांध

किशोर वंजारी - नेर
केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. या दोनही पक्षांना विजयाच्या जवळही जाता आले नाही. काँग्रेसचे देवानंद पवार यांना तर आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. पवार यांचा प्रचार तर ‘आयात उमेदवार’ असा झाला होता.
एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या तत्कालीन दारव्हा विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांना पराभव चाखावा लागला. काँग्रेसचा एकछत्री अंमल या मतदारसंघावर होता. कालांतराने या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस नेत्यांची पकड सैल झाली. मतदारराजा विविध कारणांमुळे काँग्रेसपासून दूर गेला. शिवसेनेचे संजय राठोड यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात आपली पकड मजबूत केली. तीन निवडणुकांमध्ये त्यांनी विजयच नव्हे तर मताधिक्यही प्रचंड घेतले आहे. यावेळी तर त्यांनी मताधिक्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला आहे.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी केलेली विकास कामे कुणीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव अशक्यच, ही बाब तेवढीच सत्य असतानाही त्यांच्या विरोधात ‘पॉवरफूल’ उमेदवार रिंगणात नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने वसंत घुईखेडकर यांना उमेदवारी दिली. निवडणूक काळात त्यांनी जवळपास गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपली उमेदवारी गावापर्यंत पोहोचविण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. परंतु संजय राठोड यांच्या तुलनेत बऱ्याच बाबतीत ते कमी पडले. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची तर अतिशय दैनावस्था झाली. देवानंद पवार हे या मतदारसंघासाठी नवीन होते. कार्यकर्त्यांची फळी नाही, मतदारसंघाची ओळख नाही आणि होते ते कार्यकर्ते यवतमाळात कार्यरत होते. या आणि इतर कारणांमुळे ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. केवळ १८ हजार ८०७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. तसे पाहिल्यास या मतदारसंघात येत असलेल्या नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच होते. अंतर्गत गटबाजी, समन्वयाचा अभाव आदी बाबींमुळे काँग्रेस खिळखिळी झाली आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर या पक्षाची सत्ता नाही. याच बाबी पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर जाण्यासाठी कारणीभूत ठरला.

Web Title: Dighar assembly dissolve in discontent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.