गुप्तधन शोधणारी टोळी जाळ्यात

By Admin | Updated: May 19, 2016 02:08 IST2016-05-19T02:08:35+5:302016-05-19T02:08:35+5:30

गुप्तधन शोधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून मारेगाव तालुक्यात आलेली टोळी आवळगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Detective gangs trap | गुप्तधन शोधणारी टोळी जाळ्यात

गुप्तधन शोधणारी टोळी जाळ्यात

आवळगावच्या नागरिकांचे धाडस : दोघांना अटक, घटनास्थळावरून पूजेचे साहित्य जप्त
मारेगाव : गुप्तधन शोधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातून मारेगाव तालुक्यात आलेली टोळी आवळगाव येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीतील सहा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून दोन आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.
तालुक्यातील जळका येथील प्राचिन हेमाडपंथी पांडवदेवी देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात गुप्तधन असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. अनेकांनी या परिसरात गुप्तधन काढल्याचेही बोलले जाते. या परिसरात अनेक ठिकाणी हळदी-कुंकू, लिंबू अशा पूजेच्या साहित्यासह खोदकाम केल्याच्या खुना बरेचदा दिसून येतात. मात्र नेमके खोदकामात खरच गुप्तधन मिळते काय, याचा मात्र गुप्तधन शोधणारे टोळके पोलिसांच्या हातात लागत नसल्याने शोध लागत नाही.
गेल्या सोमवारी तालुक्यातील आवळगाव येथील नीलेश सोनबा टेकाम यांच्या शेतात नांगरणी करण्याकरिता वागदरा येथील गजानन इंगोले हा रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर घेऊन गेला. तेथे त्यांना हनुमान मंदिराजवळ ८ ते १० जण संशयास्पद खोदकाम करताना आढळले. इंगोले यांनी नांगरणी न करता गावात परत जाऊन ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. गावातील दिनेश टेकाम, तुळशिराम टेकाम यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र गावकऱ्यांना बघून टोळीतील सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर मनोहर बापूराव राजूरकर (५८) रा.दरोडा, ता.हिंगणघाट व किशोर नारायण शिंदे (२२) रा.खेमकुंड, ता.राळेगाव याला गावकऱ्यांनी पकडले. या दोघांनाही पकडून ग्रामस्थांनी त्यांना गावात आणले. त्
ोथे त्यांची अधिक चौकशी केली असता, ‘आम्ही वर्धा जिल्ह्यातून गुप्तधन शोधण्यासाठी आलो असून आमच्या टोळीत आठ लोक आहे’, असे त्यांनी सांगितले. या टोळीत पूर्वी आवळगाव येथेच राहणारा आणि आता पिंपळगाव, ता.हिंगणघाट येथे राहणारा अशोक वारलुजी मडावी हा समाविष्ट असून त्यानेच आम्हाला हनुमान मंदिरामागे तीन किलो सोने असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी कबूल केले. टोळीतील किशोर शिंदे हा पायाळू असून त्याच्या मदतीने आम्ही सोन्याचा शोध घेतो, अशी माहितीही त्या दोघांनी गावकऱ्यांना दिली.
नंतर पोलीस पाटील भाऊराव टेकाम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ मारेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आवळगाव गाठून आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून लिंबू, तांदूळ, घमेले, फावडा, टिकास, दोन लोटे, हिरवा कापड व इतर साहित्य जप्त केले. वर्धा जिल्ह्यातील गुप्तधन शोधणाऱ्या टोळीकडून नरबळीच्या होणाऱ्या घटना लक्षात घेता, मारेगाव पोलिसांनी पळून गेलेल्या सहा आरोपींच्या शोधात पथक रवाना केले. मात्र वृत्तलिहिस्तोवर आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अशाप्रकारच्या घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत.
याप्रकरणी कलम २ (१) ख ४/३ महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा पायबंद कलमाखाली दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)

मारेगाव तालुक्यात यापूर्वीही घडल्या घटना
मारेगाव तालुक्यात यापूर्वीही काही नरबळीच्या घटना घडल्या आहेत. गुप्तधन काढण्यासाठी नरबळी द्यावा लागतो, अशी दंतकथा आहे. गुप्तधन शोधणारी टोळी बालकांना हेरून त्याची तजवीज करतात, असा आजवरचा अनुभव आहे. तालुक्यात घनदाट जंगली आहे. पांडवदेवी देवस्थान परिसरात तर प्राचिन काळापासून अद्यापही घनदाट जंगल आहे. या जंगलात अज्ञातवासात असताना पांडवांचे वास्तव्य होते, होते अशी आख्यायीका आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात धन असावे, असा अंदाज बांधला जातो. त्यातूनच सोमवारी या टोळीने या परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी पूजा, अर्चना केल्याचे दिसून येते. मात्र आवळगाव येथील ग्रामस्थांच्या सतर्कतने त्यांचा डाव हाणून पडला. ही टोळी नरबळी देणार होती का, या दिशेनेही पोलीस आता तपास करीत आहे. त्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले असून ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहे. ठाणेदार उमेश पाटील स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Detective gangs trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.