शेतकऱ्यांना राऊंड-अप बीटीचा विळखा
By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:40:10+5:302014-06-25T00:40:10+5:30
वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे.

शेतकऱ्यांना राऊंड-अप बीटीचा विळखा
नकली बियाणे : विदर्भाच्या पाच जिल्ह्यात रॅकेट सक्रिय
संतोष अरसोड - यवतमाळ
वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा या ठिकाणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाडी टाकून या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकोला या ठिकाणी टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे आणि यवतमाळ जिल्ह्यात टाकलेल्या धाडीत सापडलेले बियाणे यामध्ये कमालीचे साम्य आहे. यावरून विदर्भाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यात हे रॅकेट सक्रीय असल्याच्या बाबीला पुष्टी मिळत आहे.
यंदा कापसाचा पेरा वाढणार आहे हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या बियाणे व कीटकनाशकांच्या कंपन्यात काम करणाऱ्या फिल्ड असिस्टंटनी रेडी राऊंड अप हे वाण छुप्या पध्दतीने विकण्याचा सपाटा लावला. यासाठी दोन महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांशी संपर्क करण्यात आला होता. तणांचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे बरेचदा शेतीसुध्दा पडिक पडते. त्यामुळे तण नाशकाचा वापर करता येईल असे सांगत राऊंड अप बीटी वाण विकण्यात आले. ग्लायफोसेट हे तणास प्रतिबंध करणारे जिन्स रेडी राउंड अपमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे पऱ्हाटीवर तण नाशकाची फवारणी करता येते व यामुळे निंदणाचा खर्च वाचतो अशी बतावणी करीत हे वाण मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्यातच या वाणामुळे शेतात तणच उगवत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये असल्यामुळे हे महागडे व अनधिकृत बियाणे शेतकऱ्यांच्या माथी नियोजनबध्द पध्दतीने मारल्या गेले.
या बियाण्याचा विदर्भाच्या पाच जिल्ह्यांमध्ये धुमाकुळ सुरू आहे. सूर्या, आदेश आर आर, मल्लीका आर आर, सुपरतेज, बालाजी-५ अशी या बियाण्यांची नांवे आहेत. कृषी विभागाच्या कारवाईत पुसद येथे सूर्या, बाभूळगाव येथे आदेश , बालाजी- ५, पांढरकवडा येथे मल्लीका- आर आर तर दिग्रस येथे सुपरतेज बियाणे पकडण्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे मोर्शी, वरूड व अकाला येथील धाडीत जप्त केलेले बियाणे व यवतमाळ जिल्ह्यात जप्त केलेले बियाणे यात साम्य असल्यामुळे या रॅकेटमध्ये अनेक मोठे मासे असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा शोध घेणे हे कृषी विभागापुढील मोठे आव्हान आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी विवंचनेत आहे. त्यातच त्यांना आता बोगस बियाण्यांचाही सामना करावा लागतो.