आईसगोला आणि बर्फाला मागणी
By Admin | Updated: May 23, 2015 00:02 IST2015-05-23T00:02:48+5:302015-05-23T00:02:48+5:30
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर चढला आहे. आठ दिवसांपासून वाढलेले तापमान अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही.

आईसगोला आणि बर्फाला मागणी
शीतपेयाच्या दुकानासोबत मोबाईल विक्रेते आपल्याला गल्लीबोळात पाहायला मिळतात. आईसगोला, मटका कुल्फी, बर्फ, पेप्सी विक्रेते शहरभर फिरतात. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांचा बोलबाला आहे. यामुळे उन्हाळ्यात बर्फाची सर्वाधिक मागणी वाढलेली आहे.
रुपेश उत्तरवार यवतमाळ
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर चढला आहे. आठ दिवसांपासून वाढलेले तापमान अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. उन्हाची दाहकता अंगाची लाही लाही करते आहे. उन्हाच्या तडाक्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिक सावलीचाच आधार घेतो. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या शितपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. सध्या दुपारी आणि सायंकाळी बाजाराते तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.
यवतमाळ शहरात जवळपास ४०० शीतपेयांची दुकाने लागली आहेत. या दुकानांमध्ये महाराष्ट्रीयन, उत्तरभारतीय आणि राजस्थानी शीतपेयांचे प्रकार पहायला मिळतात. थेट या प्रांतांमधून आलेल्या परप्रांतीय युवकांनी उदरनिर्वाहासाठी राज्यात शीतपेयाच्या व्यवसायाची निवड केली. याचे कारणेही तसेच आहे. या व्यवसायाला लागणारे भांडवल अत्यल्प आहे. त्यातून दोन पैसे जास्त मिळतात. यामुळे शीतपेयाची अधिक दुकाने परप्रांतीयांनी थाटली आहे. इतर प्रांताच्या तुलनेत राज्यात शीतपेयाला मिळणारे दर रास्त आहेत. यामुळे परप्रांतीय युवकांनी सर्वाधिक शीतपेयाची दुकाने थाटली आहेत.
मटका कुल्फी, लस्सी, मोसंबी ज्युसची सर्वाधिक दुकाने परदेशी बांधवांचीच आहे. उत्तर प्रदेशातून जवळपास ४० ते ५० कुटुंब आले आहेत. त्यांनी फुटपाथवर आपला व्यवसाय थाटला आहे. तर काही ठिकाणी परप्रांतीय बांधवांनी महाराष्ट्रीयन बांधवांच्या मदतीने व्यवसाय सुरू केला आहे. उत्तरभारतीयांची ही कला अद्यापही महाराष्ट्रातील कारागिरांना अवगत करता आली नाही. यामुळे उत्तरभारतीयांचे शीतपेयावरचे वर्चस्व अद्यापही कायम आहे.
महाराष्ट्रीयन शीतपेयांची पकड
परप्रांतीय शीतपेयासोबत महाराष्ट्रीयन शीतपेय बाजारात आहेत. यामध्ये लिंबू- सरबत, कैरीपना, मठ्ठा, जलजिरा ह्या आयुर्वेदिक शीतपेयाची मागणी बाजारात वाढत आहे. इतकेच नव्हे तर यासाठी लागणारे दही अपुरे पडत आहे. यावर मात करण्यासाठी कंपनीचे दही पॅकिंग विके्रते जिल्ह्यात बोलाविण्यात आले आहे.
ऊस, मोसंबी आणि पायनापल
पारंपरिक शीतपेयांमध्ये ऊस, मोसंबी आणि पायनापल यांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयाची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी या शितपेयांच्या गाडया पाहायला मिळतात. काही विक्रेत्यांनी मोबाईल वाहन तयार केले आहे. ज्या चौकात अधिक गर्दी आहे अशा ठिकाणी मोबाईल वाहन थांबते. इतकेच नव्हे तर बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेता हॉकर्स ऊ साचा रसच विक्रीस नेत आहे.
टरबुजाला उठाव नाही
बाजारात मोठ्या प्रमाणात टरबूज विक्रीसाठी आले आहेत. मागणीच्या तुलनेत अधिक आवक झाल्याने टरबुजाचे दर घटले आहे. १० रूपये किलो दराने टरबूज विकले जात आहे. यानंतरही टरबुजाचा उठाव मात्र कमी आहे. यामुळे विक्रेतेही काळजीत आहेत. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
पाणपोई नावालाच
उन्हाच्या दाहकतेतून सावरण्यासाठी प्रत्येक वाटसरूची तृष्णातृप्ती व्हावी म्हणून पाणपोई चालविण्यात येते. मात्र गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणपोईची संख्या घटली आहे. पाणपोई नसल्याने सर्वसामान्याला पाणी पाऊच अथवा पाणी बॉटल खरेदी करावी लागते.
मिनरल वॉटरने सर्वसामान्य नागवला
अलीकडे नवीन चित्र पहायला मिळते आहे. शासकीय कार्यालयापासून ते व्यवसायी प्रतिष्ठानापर्यंत मिनरल वॉटरच्या कॅन पोहचल्या आहेत. यामुळे आपल्या कार्यालयातील कर्मचारी अथवा दुकानातील कामगार लक्षात घेत पाण्याच्या कॅन बोलविण्यात येतात. यामुळे बाहेरील कुठलाही व्यक्ती अथवा ग्राहक येताच पाणी मिळणार किंवा नाही, याची शंकाच आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी बॉटल अथवा पाऊचच विकत घ्यावे लागते.
विदेशी पेयापासून ग्राहक चार हात दूरच
विदेशी शितपेयात कार्बनाडाय आॅक्साईडचे प्रमाण असते आणि थोडीफार अल्कोहिक मात्रा असते. हे शीतपेय मानवी आरोग्यास घातक असल्याची बाब ग्राहकांना लक्षात येत आहे. यामुळे विदेशी शीतपेयांपासून ग्राहक आता चार हात दूर राहणेच पसंत करत आहेत.
कोन, आईस्क्रीम आणि चोकोबारला पसंती
उन्हाळ्याच्या सुट्यात बच्चे कंपनीचा सर्वाधिक ओढा कोन, आईस्क्रीम आणि चोकोबारकडे आहे. रात्रीच्या वेळेस या दुकानांमध्ये ग्राहक मावत नाही. मध्यमवर्गीय ग्राहकांचा सर्वाधिक कल या शीतपेयाच्या दुकानात पाहायला मिळतो.