दुष्काळात ‘कृषिभूषण’ ओवाळून घेतोय ‘दीपक’
By Admin | Updated: December 27, 2014 23:00 IST2014-12-27T23:00:34+5:302014-12-27T23:00:34+5:30
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होतो, असे सांगितले जाते. तसाच काहीसा अनुभव पुष्पवंतीनगरीत आला. विदर्भ-मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ‘कृषिभूषण’ स्वत:च स्वत:ला ‘दीपक’

दुष्काळात ‘कृषिभूषण’ ओवाळून घेतोय ‘दीपक’
प्रकाश लामणे - पुसद
रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होतो, असे सांगितले जाते. तसाच काहीसा अनुभव पुष्पवंतीनगरीत आला. विदर्भ-मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ‘कृषिभूषण’ स्वत:च स्वत:ला ‘दीपक’ ओवाळून घेत होते. शहरात लागलेले शुभेच्छा फलक आणि कार्यक्रमाचा थाटमाट पाहता लाखोंची उधळपट्टी झाली, हे निश्चित.
पुसदनगरीने शेतकऱ्यांशी जिव्हाळा असणारे उत्तुंग व्यक्तीमत्व दिले आहे. अशाच पुसद शहरात शनिवारी षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा झाला. शहरातील रस्ते-रस्ते आणि खांबन्खांब शुभेच्छा फलकांनी वेढलेले होते. कोणत्याही चौकात बघितले तरी मोठ्ठाले होर्डिंग्ज आणि कटआऊट झळकत दिसले. शुभेच्छुक वेगवेगळे असले तरी त्याचा खर्च कोण करीत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यानिमित्ताने पाच हजार पाहुण्यांंना संध्याकाळचे स्नेहभोजन, दोन हजार पाहुण्यांना सकाळचा स्वादिष्ट नास्ता दिला गेला. रोषणाई आणि महाविद्यालयाचा परिसर एखाद्या नवरी सारखा सजला होता.
राजेशाही थाटालाही लाजवेल असा हा सोहळा शनिवारी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात अनेकांनी अनुभवला. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. कर्जबाजारी व नापिकीने शेतकरी विषाचा घोट घेत आहे. यंदा तर भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत कृषीभूषणांचा हा सोहळा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. वसंतराव नाईकांच्या स्मृती जपत प्रतिष्ठान चालविणाऱ्या कृषीभूषणांनी आपली ‘प्रतिष्ठा’ जोपासण्यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचे बोलले जात आहे. जनमानसात या सोहळ्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. खुद्द माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनीसुद्धा या सोहळ्याबद्दल खासगीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र उत्साहाला मोल नसते. रोम जळत असले तरी आनंद घेणारे निरो सर्वत्रच दिसतात. त्यात कृषीभूषणांची भर पडावी याचे मात्र दु:ख आहे.